फुकटफौजदार बनून पालिकेच्या कार्यशाळांमध्ये राबणूक

विविध विभागांच्या कार्यशाळांमध्ये आवश्यकतेनुसार एक वर्षांसाठी पालिकेने शिकाऊ उमेदवारांची (अ‍ॅप्रॅन्टिस) भरती केली. मात्र गेले तीन महिने पालिकेच्या कार्यशाळेत घाम गाळल्यानंतर बहुसंख्य शिकाऊ उमेदवारांच्या हातावर विद्यावेतन ठेवण्यास पालिकेला विसर पडला आहे.

त्यामुळे पालिकेच्या कार्यशाळांमध्ये फुकटफौजदार बनून काम करीत असलेल्या शिकाऊ उमेदवारांना कामाच्या ठिकाणी जाण्या-येण्याच्या खर्चासाठी पालकांपुढे हात पसरावे लागते आहेत. पालिका फुकटफौजदारी कधी संपुष्टात आणणार, असा प्रश्न या मंडळींना पडला आहे.

मुंबई महापालिकेच्या विविध विभागांच्या कार्यशाळा असून अनेक पदे रिक्त असल्यामुळे या कार्यशाळांमध्ये मनुष्यबळाची कमतरता भासते. ही कमतरता शिकाऊ उमेदवारांच्या मदतीने काही अंशी भरून काढली जाते. तसेच शिकाऊ उमेदवारांना कामाचा अनुभव मिळतो आणि पालिकेला मनुष्यबळासाठी हातभार लागतो. पालिकेने ऑगस्ट-सप्टेंबर २०१७ दरम्यान सरकारी संकेतस्थळावर जाहिरात प्रकाशित करून आयआयटीमध्ये कातारी (टर्नर), वीजतंत्री (इलेक्ट्रीशिअन), सुतार, रंगारी, यांत्रिकी (मेकॅनिकल), संधाता (वेल्डर) आदी अभ्यासक्रमांचे प्रशिक्षण घेत असलेल्यांना शिकाऊ उमेदवार म्हणून अर्ज करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार अनेकांनी शिकाऊ उमेदवार पदासाठी अर्ज सादर केले. पालिकेने एक वर्षांसाठी ११० जणांना शिकाऊ उमेदवार म्हणून सेवेत घेतले आणि त्यांना आपल्या विविध कार्यशाळांमध्ये पाठवले.

निवड झालेले शिकाऊ उमेदवार जानेवारी २०१८ मध्ये पालिकेच्या विविध विभागांच्या कार्यशाळेत रुजू झाले आणि पालिका कर्मचाऱ्यांच्या जोडीने त्यांनी कामाला सुरुवात केली. पालिका कर्मचाऱ्यांकडून त्यांना कामाचा दांडगा अनुभव मिळत आहे. शिकाऊ उमेदवार म्हणून नियुक्त होताना या प्रशिक्षणार्थीना महिन्याला १४ हजार रुपये विद्यावेतन देण्याचे निश्चित झाले होते, परंतु मार्च महिना संपला तरी बहुसंख्य शिकाऊ उमेदवारांना विद्यावेतन मिळालेले नाही. ही मंडळी दररोज नित्यनियमाने कार्यशाळेत हजेरी लावून पालिका कर्मचाऱ्यांच्या जोडीने काम करीत आहेत.

उपनगरांमध्ये राहणाऱ्या या प्रशिक्षणार्थीनी पालकांकडून पैसे घेऊन रेल्वेचा एक महिन्याचा पास काढला होता. पालिकेकडून विद्यावेतन मिळाल्यानंतर फेब्रुवारीमध्ये स्वपैशाने रेल्वेचा पास काढण्याचा या मंडळींचा विचार होता, परंतु फेब्रुवारीच नव्हे, तर मार्चमध्येही त्यांना विद्यावेतन मिळालेले नाही. आणखी किती महिने विद्यावेतनासाठी प्रतीक्षा करावी लागणार, अशी विचारणा हे प्रशिक्षणार्थ्यांकडून करण्यात येत आहे.

शिकाऊ उमेदवारांना विद्यावेतन देण्याची प्रक्रिया सुरू आहे. लवकरात लवकर त्यांना विद्यावेतन देण्यात येईल.

– सुधीर नाईक, उपायुक्त (सामान्य प्रशासन)