गणेश मंडळांना मंडपाचे आकारमान कमी करण्याची महापालिकेची सूचना

मुंबई : उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पादचारी आणि वाहतुकीला अडथळा ठरणार नाही असा मंडप उभारण्यात यावा, अशी भूमिका पालिका, वाहतूक पोलीस आणि स्थानिक पोलीस ठाण्याने घेतल्याने आकर्षक गणेशमूर्ती आणि सजावटीसाठी प्रसिद्ध असलेल्या दक्षिण मुंबईमधील १४ खेतवाडय़ांमध्ये गणेशोत्सवानिमित्त उभारण्यात येणाऱ्या मंडपाबाबत पेच निर्माण झाला आहे. मंडपाचे आकारमान कमी केल्यास गणेशमूर्ती ठेवायची कशी, असा सवाल मंडळांच्या पदाधिकाऱ्यांकडून उपस्थित करण्यात येत आहे.

दक्षिण मुंबईमधील १ ते १४ खेतवाडय़ांमध्ये मोठय़ा प्रमाणावर गणेशोत्सव साजरा करण्यात येतो. आकर्षक सजावट आणि निरनिराळ्या रूपातील उंच गणेशमूर्तीचे दर्शन घेण्यासाठी भाविक दरवर्षी खेतवाडय़ांमध्ये प्रचंड गर्दी करतात. येथे छोटी-मोठी अशी सुमारे ३१ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आहेत. काही खेतवाडय़ांमध्ये उभारण्यात येणाऱ्या मंडपांमुळे वाहतूक बंद ठेवावी लागते. केवळ पादचाऱ्यांना गल्लीच्या एका टोकावरून दुसऱ्या टोकाला जाण्यासाठी मंडपस्थळातून छोटी मार्गिका उपलब्ध करण्यात येते. मात्र या मार्गिकेमधून वाहनांची ये-जा होऊ शकत नाही.

गणेशोत्सवानिमित्त पादचाऱ्यांचा आणि वाहतुकीचा रस्ता अडवून बेशिस्तपणे रस्त्यावर उभारण्यात येणाऱ्या मंडपांची मुंबई उच्च न्यायालयाने गंभीर दखल घेतली असून त्यांना परवानगी देऊ नये, असे स्पष्ट आदेश दिले आहेत. त्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून खेतवाडय़ांमधील मंडप परवान्याबाबत पेच निर्माण झाला आहे. गेली दोन वर्षे मंडळांकडून पालिकेकडे अर्ज करण्यात आले. मात्र, वाहतूक पोलिसांनी ‘ना हरकत’ प्रमाणपत्र न दिल्यामुळे पालिकेकडून मंडप परवाना देण्याबाबत असमर्थता व्यक्त करण्यात आली होती. त्या वेळी मंडळांवर कोणतीच कारवाई झाली नाही. मात्र यंदा मंडपांबाबतच्या न्यायालयाच्या आदेशांची काटेकोरपणे अंमलबजावणी पालिका, वाहतूक पोलीस आणि स्थानिक पोलीस ठाण्यांना करावी लागणार आहे. त्या अनुषंगाने पालिकेच्या अधिकाऱ्यांनी खेतवाडय़ांमधील मंडळांशी चर्चा सुरू केली. या वेळी न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्यासाठी मंडळांनी मंडपाचा आकार कमी करावा, असे पालिकेकडून सांगण्यात आले. परंतु खेतवाडय़ांमधील सर्वच गल्ल्या अरुंद आहेत.

अरुंद गल्ल्यांमधून वाहन जाण्यासाठी जागा सोडल्यानंतर जेमतेम १० फूट जागा मंडप उभारण्यास शिल्लक राहू शकेल. इतक्या कमी जागेत गणेशमूर्ती कशी काय ठेवायची, असा प्रश्न खेतवाडय़ांमधील ३१ मंडळांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या अखिल खेतवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मध्यस्थ मंडळाने उपस्थित केला आहे.

न्यायालयाच्या आदेशाचा आदर राखून मंडपाचा आकार कमी करावा आणि वाहन जाईल इतकी जागा मोकळी सोडावी. मंडळांनी उत्सव साजरा करण्यासाठी पालिका, पोलीस आणि वाहतूक पोलिसांनी योग्य ते सहकार्य करावे.

– विश्वास मोटे, साहाय्यक आयुक्त, ‘डी’ विभाग कार्यालय

खेतवाडय़ांमधील मंडळे दरवर्षी गणेश आगमन, विसर्जनाची मिरवणूक, ध्वनिक्षेपकाचा वापर यांबाबत परवानगी घेत आहेत. येथील गल्ल्या चिंचोळ्या असून मंडपाचे आकारमान कमी केल्यास गणेशमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी जागा अपुरी पडेल. मुख्य रस्ता आणि बॅक रोडच्या मध्यभागी खेतवाडय़ा आहेत. या दोन्ही रस्त्यांवरून रुग्णवाहिका आणि अग्निशमन दलाच्या गाडय़ा जाऊ शकतात. 

– नलिन मोदी, सरचिटणीस, अखिल खेतवाडी सार्व. गणेशोत्सव मध्यस्थ मंडळ

न्यायालयाच्या आदेशाचा आदर राखून मंडळांना मंडप उभारणीसाठी परवानगी देण्याची तयारी पालिकेने दर्शविली असून हा प्रश्न सोडवण्यासाठी समन्वय समिती मंडळांच्या पाठीशी उभी राहील. येथील मंडळांनी अद्याप मंडप परवानगीसाठी अर्ज केलेला नाही. अर्ज केल्यानंतर तातडीने परवानगी मिळू शकेल. त्यामुळे मंडळांनी मंडप उभारणीसाठी पालिकेकडे अर्ज सादर करावा.

– अ‍ॅड. नरेश दहिबावकर, अध्यक्ष, सार्व. गणेशोत्सव समन्वय समिती