पालिकेकडून एक आठवडय़ाची वाढीव मुदत मिळाल्यावर कॅम्पा कोलातील रहिवाशांनी एकीकडे घरे रिकामी करण्यास सुरुवात केली आहे, तर दुसरीकडे इमारतीच्या आवारात तंबू ठोकून तिथेच राहण्याचा हेकाही धरला आहे. मात्र, कॅम्पा कोलातील इमारतींची पाहणी पालिका कर्मचाऱ्यांनी केली असून, इमारतींच्या आवारात अनधिकृतपणे बांधलेल्या तंबूलाही कारणे दाखवा नोटीस दिली जाणार आहे.
कॅम्पा कोलातील अनधिकृत घरांमधील रहिवाशांना आता घरे सोडावी लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, अखेरचा उपाय म्हणून त्यांनी आवारातच तंबू ठोकला आहे. परंतु हा तंबूही अनधिकृत असल्याने त्यावरही पालिकेकडून कारवाई होणार आहे. पालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून या ठिकाणी पाहणी करण्यात आली असून, शनिवारी कॅम्पा कोलाच्या रहिवाशांना घरे रिकामी करण्याची नोटीस देताना तंबूलाही नोटीस दिली जाणार आहे. गुरुवारी पालिका बांधकाम तोडण्याच्या कारवाईला सुरुवात करेल. पालिकेच्या कारवाईबाबत पोलिसांना कळवण्यात येत असून सुरक्षा नेमकी किती व कशी असावी त्याबाबत पोलीस निर्णय घेतील, असे पालिका अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
 दरम्यान, कॅम्पा कोलाच्या नागरिकांचा सहानुभूतीने विचार करावा यासाठी वर्षभर त्यांची पाठराखण करणारे विविध पक्षाचे नेतेही आता शांत झाले आहेत. सध्याच्या पालिका प्रशासनाच्या कॅम्पा कोलावरील कारवाईबाबत एकाही राजकीय नेत्याने विरोध केलेला नाही, असे अडताणी यांनी सांगितले.