News Flash

बायको चुकली.. स्टॅण्डवर!

मुंबई महापालिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याची पत्नी आगारातून बेपत्ता झाल्यानंतर एकच गोंधळ उडाला

संग्रहित छायाचित्र

 

पालिका अधिकाऱ्याच्या पत्नीच्या शोधात अवघी एसटी यंत्रणा

लक्ष्मीकांत बेर्डे आणि वर्षां उसगांवकर यांची भूमिका असलेला ‘बायको चुकली स्टँडवर’ नावाचा एक मराठी चित्रपट काही वर्षांपूर्वी येऊन गेला होता. या चित्रपटाचा आशय वेगळा असला तरी त्याच्या शीर्षकाचे स्मरण करून देणारी घटना मंगळवारी मुंबई सेंट्रल येथील एसटी आगारात घडली. मुंबई महापालिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याची पत्नी आगारातून बेपत्ता झाल्यानंतर एकच गोंधळ उडाला आणि त्यांना शोधण्यासाठी आगारातील एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह अवघी यंत्रणा कामाला लागली..

मुंबई सेंट्रलच्या बस आगारात सायंकाळी एक कार दाखल झाली. त्यामध्ये पालिकेचे एक वरिष्ठ अधिकारी व त्यांच्या पत्नी होत्या. अधिकारी कार ‘पार्किंग’ करून परतले असता त्यांना पत्नी तेथे नसल्याचे आढळून आले. त्यांनी शोधाशोध सुरू केली. एसटीच्या कर्मचाऱ्यांनाही त्या ठिकाणी बोलविण्यात आले. कर्मचाऱ्यांनी संपूर्ण एसटी आगार पालथे घातले, पण कुठेही त्यांचा थांगपत्ता लागत नव्हता. फोनाफोनी सुरू झाली, मात्र मोबाइलही बंद. त्यामुळे चिंता वाटू लागली. कदाचित घरी गेल्या असतील अशा आशेने ते अधिकारी पुन्हा घरी गेले. मात्र तिथेही त्या नव्हत्या. यानंतर त्यांच्या चिंतेत अधिकच भर पडली. ते पुन्हा आगारात आले. एसटीतील काही वरिष्ठांनीही मग या शोध मोहिमेत सहभाग घेतला. अगदी सीसीटीव्हीच्या साहाय्याने चित्रीकरण पाहण्यात आले. त्या चित्रीकरणात त्या एसटीमध्ये चढल्याचे दिसत होते. मात्र, ती एसटी कोणती होती याचा शोध लागत नव्हता. अखेर शेवटचा पर्याय म्हणून त्या अधिकाऱ्याने पोलिसात जाण्याचे ठरविले. रात्रीचे अकरा वाजले होते. हे अधिकारी पोलीस ठाण्याच्या दारात असतानाच त्यांचा फोन खणाणला. ‘हॅलो.. मी घरी पोहोचले.. माझा फोन स्विच ऑफ असल्यामुळे संपर्क होऊ शकला नाही..’ अधिकाऱ्याची पत्नीच पलीकडून बोलत होती. आपल्या पत्नीचा आवाज ऐकताच त्या अधिकाऱ्याच्या जीवात जीव आला आणि एसटीच्या कर्मचाऱ्यांनीही सुटकेचा नि:श्वास टाकला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 24, 2016 3:16 am

Web Title: bmc officer wife missing story in mumbai central st depot
Next Stories
1 हार्बरकरांचा प्रवास हवेशीर होणार
2 बॉम्बे जिमखान्यापुढे पालिकेची नांगी
3 महापरिनिर्वाणदिनी गैरसोय    
Just Now!
X