मुंबईची तुलना पाकिस्तानव्याप्त काश्मीरशी केल्याने चर्चेत असलेल्या अभिनेत्री कंगना रणौतच्या कार्यालयावर मुंबई महापालिकेकडून कारवाई करण्यात आली आहे. मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी कंगनाच्या जुहू येथील कार्यालयामधील अनधिकृत बांधकाम तोडण्यास सुरुवात केली आहे. महापालिकेच्या कारवाईवर कंगनाने संताप व्यक्त करत पुन्हा एकदा मुंबईचा पाकिस्तानव्याप्त काश्मीर असा उल्लेख केला आहे. तसंच पालिका कर्मचारी आणि पोलिसांचा उल्लेख बाबरची सेना असा केला आहे.

महापालिकेकडून कंगनाला जुहू येथील कार्यालयात अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी नोटीस बजावण्यात आली होती. उत्तर देण्यासाठी कंगनाला २४ तासांची मुदत देण्यात आली होती. पण कंगनाकडून कोणतंही उत्तर न दिल्याने आज सकाळी पालिकेकडून तोडक कारवाईला सुरुवात करण्यात आली. महापालिकेकडून कारवाईसाठी बुलडोझरचाही वापर करण्यात आला.

पालिकेकडून करण्यात आलेल्या कारवाईचे फोटो कंगनाने ट्विट करण्यात आले असून बाबरची सेना, पाकिस्तान, पाकिस्तानव्याप्त काश्मीर असे उल्लेख करण्यात आले आहेत. ही लोकशाहीची हत्या असल्याचंही तिने म्हटलं आहे.

दरम्यान पालिकेच्या कारवाईविरोधात कंगनाच्या वकिलाने उच्च न्यायालयात धाव घेतली असून दुपारी सुनावणी होणार आहे.

कंगनाच्या कार्यालयावर सूड भावनेने कारवाई केली जात आहे – राम कदम
भाजपा नेते राम कदम यांनी कंगनाच्या वक्तव्याला भाजपाचं समर्थन नाही असं स्पष्ट करताना तिच्या कार्यालयावर सूडबुद्धीने कारवाई केली जात आहे असा आरोप केला आहे. कंगनाचं मनोधैर्य खच्चीकरण करण्याचा प्रयत्न सुरु आहे असंही ते एबीपी माझाशी बोलताना म्हणाले आहेत. नोटीस दिल्यानंतर बाजू मांडण्याची मुभा द्यायला हवी होती असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे.