अभिनेत्री कंगना रणौतने मुंबईबद्दल केलेल्या वक्तव्यावरुन सुरु झालेल्या वादामध्ये आता मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी दखल दिल्याचा दावा कंगाने केला आहे. ट्विटरवरुन कंगनाने आज माझ्या मुंबईतील ऑफिसमध्ये मुंबई महागनरपालिकेचे काही अधिकारी आले होते आणि त्यांनी ऑफिसमधील जागेचे मोजमाप घेऊन उद्या बांधकाम पाडणार असल्याचे सांगितल्याचा दावा कंगनाने केला आहे. मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी ऑफिसमध्ये आल्याचे काही व्हिडिओ कंगनाने ट्विटरवरुन पोस्ट केले आहेत.

आज महापालिकेचे अधिकारी आपल्या ऑफिसमध्ये बळजबरीने शिरल्याचा आरोप कंगनाने केला आहे. यासंदर्भात तीने तीन ट्विट केले आहेत. पहिल्या ट्विटमध्ये तिने आपल्या ऑफिसबद्दल माहिती दिली आहे. “हे माझं मुंबईमधील मणिकर्णिका फिल्मचे ऑफिस आहे. १५ वर्ष मेहनत करुन मी हे उभं केलं आहे. जेव्हा मी चित्रपट निर्माती होईल तेव्हा माझं स्वत:चं ऑफिस असावं असं माझं स्वप्न होतं. मात्र आता माझं हे स्वप्न तुटताना मला दिसत आहे. माझ्या ऑफिसमध्ये अचानक मुंबई महानगरपालिकेचे काही लोकं शिरले आहेत,” असं कंगनाने पाहिल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

दुसऱ्या ट्विटमध्ये तिने बळजबरीने ऑफिसमध्ये घुसून मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी मोजमाप घेतल्याचा दावा केला आहे. “ते बळजबरीने माझ्या ऑफिसात घुसले आणि सर्व गोष्टींची मापं घेऊ लागले. माझ्या शेजाऱ्यांनाही त्यांनी त्रास दिला. जेव्हा त्यांनी यासंदर्भात तक्रार करण्याचा प्रयत्न केला तेव्हा, ‘त्या मॅडमच्या कृत्याचे परिणाम सर्वांना भोगावे लागणार आहेत’ अशी भाषा अधिकाऱ्यांनी वापरली. उद्या ते येथील काही भाग तोडणार असल्याचे मला सांगण्यात आलं आहे,” असं कंगनाने दुसऱ्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

पुढच्या ट्विटमध्ये तिने आपल्याकडे या संपत्तीसंदर्भातील सर्व कागदपत्र असल्याचे स्पष्ट केलं आहे. “माझ्याकडे यासंदर्भातील सर्व कागदपत्र आणि मुंबई महानगरपालिकेच्या सर्व परवानग्या आहेत. माझ्या मालकीच्या या जागेवर काहीही अनधिकृतपणे बांधण्यात आलेले नाही. मुंबई महानगरपालिकेने मला स्ट्रक्चरल प्लॅन पाठवावे तसेच अनधिकृत बांधकामासंदर्भातील नोटीस पाठवावी. मात्र त्यांनी आज माझ्या ऑफिसवर छापा टाकला आणि उद्या कोणतीही नोटी न देताना ते बांधकाम पाडणार आहेत,” असं कंगनाने म्हटलं आहे.

मुंबईची तुलना पाकव्यप्त काश्मीरशी करण्यावरुन कंगना आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यामध्ये मागील काही दिवसांपासून शाब्दिक वाद सुरु आहेत. दोन्हीकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्यात आल्यानंतर आज कंगनाने या प्रकरणामध्ये महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी उडी घेतल्याचा आरोप अप्रत्यक्षपणे केला आहे.