मुंबईमधील स्वाईन फ्लूची साथ नियंत्रणात आल्याचा दावा पालिकेच्या आरोग्य विभागाकडून शुक्रवारी करण्यात आला. स्वाईन फ्लूची बाधा झालेले मुंबईतील २४४ पैकी १३६ रुग्ण बरे झाले आहेत. तर १३ हजार जणांच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले असून त्यापैकी १७२ जणांना स्वाईन फ्लू झाल्याचे निष्पन्न झाल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
स्वाईन फ्लूचा मुकाबला करण्यासाठी पालिकेच्या आरोग्य विभागाने ठोस उपाययोजना करण्यास सुरुवात केली होती. पालिकेच्या कस्तूरबा रुग्णालयात स्वाईन फ्लूसाठी स्वतंत्र कक्ष सुरू करण्यात आला असून साध्या २८ खाटा आणि अन्य १८ खाटा सज्ज ठेवण्यात आल्या आहेत, अशी माहिती देऊन अतिरिक्त आयुक्त संजय देशमुख म्हणाले की, स्वाईन फ्लूच्या साथीवर नियंत्रण मिळविण्यात पालिकेला यश आले असून मुंबईकरांना घाबरून जाऊ नये.आतापर्यंत मुंबईमध्ये २४४ जणांना स्वाईन फ्लू झाल्याचे उघड झाले असून त्यापैकी ११ जणांना मृत्यू झाला. मृत्यू झालेल्यांमध्ये मुंबईतील केवळ एकाच नागरिकाचा समावेश आहे, असे सांगून संजय देशमुख म्हणाले की, प्रकृती सुधारल्यामुळे १३६ जणांना घरी पाठविण्यात आले आहे. तर ४५ जण घरी उपचार घेत आहेत. मुंबईतील विविध रुग्णालयांमध्ये शुक्रवारी २१ रुग्ण दाखल झाले आहेत. मात्र त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.