अग्निशमन दलातील जवानांसाठी आवश्यक असलेली गमबूटांची जोडी बाजारात सुमारे दोन हजार रुपयांना मिळत असताना ती केवळ ८८२ रुपयांना खरेदी करण्याचा घाट पालिका प्रशासनाने घातला आहे. राजस्थान युनिफॉर्म क्लोथिंग कंपनीकडून पुरवठा करण्यात येणाऱ्या गमबूटांबाबत नगरसेवकांनी शंका व्यक्त केली आहे.
अग्निशमन दलातील जवानांसाठी ११ हजार गमबूट खरेदी करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. गमबूट खरेदीसाठी सुमारे १ कोटी ४० लाख रुपये खर्च पालिकेला अपेक्षित होता. त्यासाठी निविदा मागविण्यात आल्या होत्या. पाच कंपन्यांनी आपल्या निविदा पालिकेकडे सादर केल्या होत्या. रेड स्टार या कंपनीने निविदेमध्ये प्रतिजोडी गमबूटांसाठी १,६२५ दर भरला होता. त्यामुळे पालिकेला एकूण १ कोटी ७८ लाख रुपये खर्च करावे लागणार होते. राजस्थान युनिफॉर्म क्लोथिंग कंपनीने ३८ टक्के कमी दराने निविदा सादर केली होती. प्रति गमबूट ८८२ रुपये दराने शूज पुरवठा करण्याची तयारी या कंपनीने दर्शविली होती. यामुळे पालिकेला ९१ लाख ८००० रुपये खर्च येणार आहे. काळबादेवी दुर्घटनेमुळे अग्निशमन दलावर दु:खाची अवकळा पसरली आहे. अपेक्षित खर्चापेक्षा कमी दराने निविदा सादर केलेल्या कंपनीला लाखो रुपयांचे कंत्राट देण्याच्या तयारीत आहे. प्रशासनाला अग्निशमन दलातील अधिकारी-जवानांच्या जिवाची पर्वा नसल्याचेच या खरेदीवरून दिसून येत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र आंबेरकर यांनी यावेळी केला.