27 February 2021

News Flash

पालिकेला केवळ ४० टक्के उत्पन्न!

करोनामुळे पालिकेचा खर्च वाढला असून टाळेबंदीमुळे उत्पन्न घसरले आहे.

(संग्रहित छायाचित्र)

 

करोनाचा परिणाम; अर्थसंकल्पातील ४८ टक्के निधीचा वापर

मुंबई : पालिकेच्या २०२०-२१ या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पातील आर्थिक तरतुदींपैकी ४८ टक्के निधी डिसेंबरपर्यंत खर्च करण्यात आला आहे. तर एकूण महसुली उत्पन्नाच्या केवळ ४० टक्के उत्पन्न वसूल करण्यात पालिकेला यश आले आहे.

गेल्या काही वर्षांच्या तुलनेत यावर्षी तरतुदीपैकी जास्तीत जास्त निधी खर्च झाला आहे. सर्वात जास्त निधी हा रस्ते आणि पूल विभागासाठी व त्याखालोखाल सागरी किनारा मार्गासाठी १ हजार १८९ कोटी ७५ लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत.

महापालिकेने गेल्या वर्षी ३३ हजार ४४१ कोटी २ लाख रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला होता. त्यापैकी ११ हजार ७६४ कोटी रुपये भांडवली खर्चासाठी तरतूद केली होती. मात्र डिसेंबरअखेरपर्यंत त्यापैकी केवळ ५ हजार ७४४ कोटी ७० लाख रुपये म्हणजेच ४८ टक्के निधी खर्च झाले आहेत. गेल्या वर्षी याच वेळी ४५ टक्के निधी खर्च झाला होता.

सर्वात श्रीमंत महापालिका अशी ख्याती असलेल्या मुंबई महापालिकेचा येत्या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प पुढील आठवड्यात सादर होणार आहे. करोनामुळे पालिकेचा खर्च वाढला असून टाळेबंदीमुळे उत्पन्न घसरले आहे. त्यामुळे गेल्यावर्षीच्या अर्थसंकल्पातील किती निधी खर्च झाला आणि किती उत्पन्न जमा झाले याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे. पण त्याचबरोबर पुढील वर्षीचा अर्थसंकल्प कसा असेल, याबाबतही उत्सुकता आहे. पुढील अर्थसंकल्प तुटीचा असण्याची शक्यता लोकप्रतिनिधींकडून वर्तवली जात आहे.

झाले काय?

  • टाळेबंदीमुळे पालिकेच्या उत्पन्नात घट झाली आहे. गेल्या वर्षीच्या आकडेवारीवरून हे सिद्ध होते. गेल्या वर्षी डिसेंबर अखेरीस ५९ टक्के उत्पन्न जमा झाले होते. यंदा मात्र केवळ ४० टक्के उत्पन्न वसूल करण्यात पालिकेला यश आले आहे.
  • यंदा २८,४४८ कोटी उत्पन्नाचे उद्दिष्ट्य ठरवण्यात आले होते. त्यापैकी डिसेंबरअखेरपर्यंत केवळ ११,६१६.०१ कोटी म्हणजेच ४०.८३ टक्के महसूल जमा झाला आहे. त्यातही जकातीची नुकसानभरपाई म्हणून राज्य सरकारकडून ७३३९.१४ कोटी मिळाल्यामुळे हे उत्पन्न वाढलेले दिसत आहे.
  • मात्र मालमत्ता कर, पाणीपट्टी, विकास नियोजन अशा सर्वच विभागांतील उत्पन्न घटल्यामुळे महसुलावर परिणाम झाला आहे. डिसेंबर अखेरपर्यंत मालमत्ता कराचे केवळ ७३४.३४ कोटी उत्पन्न मिळू शकले आहे.
  •  मालमत्ता करातून ६७६८ कोटींचे उत्पन्न मिळेल असे अपेक्षित धरण्यात आले होते. येत्या तीन महिन्यांत पालिकेला आपले लक्ष्य गाठावे लागणार आहे.

येत्या आर्थिक वर्षातील अर्थसंकल्प हा पालिकेच्या प्रथेप्रमाणे वाढता असेल. – पी. वेलरासू, अतिरिक्त आयुक्त,        मुंबई महानगरपालिका

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 31, 2021 1:29 am

Web Title: bmc palika budget fund only 40 percentage income akp 94
Next Stories
1 जबाब बदलण्यासाठी ‘ईडी’कडून दबाव!
2 मेट्रोच्या वेळापत्रकात उद्यापासून बदल
3 करोना उपचार केंद्रे ३१ मार्चपर्यंत सुरू
Just Now!
X