४० मजल्यांपर्यंत मंजुरी पालिकेच्या पातळीवर; समितीच्या शिफारसींना सरकार अनुकूल
मुंबईत १२० मीटर म्हणजेच ४० मजल्यांपर्यंतच्या इमारतींना मंजुरी देण्याचे अधिकार पालिका आयुक्तांना देण्याचे प्रस्तावीत असून तशा शिफारशी राज्य शासनाकडे सादर करण्यात आल्या आहेत. या शिफारशींना नगरविकास विभागाकडून मंजुरी मिळाल्यास शहर तसेच उपनगरात अडकलेल्या असंख्य इमारतींचा मार्ग मोकळा होणार आहे. ४० मजल्यांपर्यंतच्या उत्तुंग इमारतींसाठी याआधी संबंधित समितीची मंजुरी घ्यावी लागत असे. त्यामुळे यापुढे ४० मजल्यांपुढील इमारतींसाठीच या समितीकडे जावे लागेल.
विकास नियंत्रण नियमावली ३३ (७) म्हणजेच जुन्या इमारतींचा पुनर्विकास आणि ३३ (९) म्हणजेच समूह पुनर्विकासात बहुतांश इमारती या ७० मीटरपेक्षा (२१ मजले) अधिक व १२० मीटरपेक्षा कमी उंचीच्या इमारती आहेत. पालिका आयुक्तांना ७० मीटरपर्यंतच मंजुरी देण्याचे अधिकार असल्यामुळे या उत्तुंग इमारतींसाठी संबंधित समितीचे उंबरठे झिजवावे लागत असे. या समितीची बैठक तीन महिन्यांतून एकदाच होत असे. काही वेळा सहा ते नऊ महिने एकही बैठक न झाल्यामुळे उत्तुंग इमारतींचे प्रस्ताव प्रलंबित होते. यामुळे संबंधित विकासक तसेच वास्तुरचनाकार हैराण झाले होते. महाराष्ट्र चेंबर ऑफ हौसिंग इंडस्ट्रीज तसेच प्रॅक्टिसिंग आर्किटेक्टर्स असोसिएशनने ही बाब मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आणून दिली होती. त्यानंतर पालिका आयुक्त अजय मेहता यांच्या अध्यक्षतेखाली या प्रकरणी समिती नेमली होती. या समितीने गेल्या महिन्यांत आपल्या शिफारशी शासनाला सादर केल्या आहेत. या शिफारशींनुसार १२० मीटरपेक्षा अधिक उंचीच्या इमारतींच्या परवानगीसाठीच संबंधित समितीकडे अधिकार द्यावेत, अशी प्रमुख शिफारस केली आहे. त्याखालील उंचीच्या इमारतींच्या मंजुरीचे अधिकार पालिका आयुक्तांपर्यंत द्यावेत, अशीही एक शिफारस असून त्याला शासन अनुकूल आहे. तसे झाल्यास मुंबईतील उत्तुंग इमारतींच्या परवानगीचा प्रश्न सुटणार असल्याचा दावा नगरविकास विभागातील एका अधिकाऱ्याने केला.
याआधी ७० मीटरपेक्षा एकही मीटर अधिक असल्यास या समितीपुढे विकासकांना यावे लागत होते. या शिफारशी मंजूर झाल्यास अनेक विकासकांना ४० मजल्यांपर्यंतच्या इमारतींच्या मंजुरीचे अधिकार पालिकेच्या पातळीवरच मिळणार आहेत. मात्र केंद्रीय वा राज्याचा पर्यावरण विभाग तसेच सागरी हद्द व्यवस्थापन विभाग आदी परवानग्या मात्र घ्याव्या लागतील.

मुंबईतील गगनचुंबी इमारती (कंसात उंची मीटरमध्ये)
वर्ल्ड वन (४४२), थ्री सिक्टी वेस्ट टॉवर बी (३६१.२), पलायस रॉयल (३२०), ओमकार १९७३ टॉवर बी (३२०), लोखंडवाला मिनव्‍‌र्हा (३०७), ओमकार १९७३ टॉवर ए (३००), एचबीएस स्कायलिंक (३००), इंडिया बुल्स स्काय सूटस् (२९१), इंडिया बुल्स स्काय फॉरेस्ट (२८१), ओमकार १९७३ टॉवर सी (२८०).