टोक्योच्या धर्तीवर जलबोगदे बनवण्याचा पालिकेचा विचार

मुंबई : पावसाळय़ात निर्माण होणारी पूरसदृश स्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मुंबई महापालिका शहरात भूमिगत जलबोगदे तयार करण्याचा विचार करत आहे. जपानी तंत्राची मदत घेत टोक्यो शहराच्या धर्तीवर असे जलबोगदे बनवून त्याद्वारे पावसाचे पाणी समुद्रात सोडण्याची योजना आहे.

जपानमधील संबंधित संस्थेचे अधिकारी व तंत्रज्ञ यांनी आज पालिका मुख्यालयात पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांच्या उपस्थितीत या प्रकल्पाचे सादरीकरण केले. महापालिका अधिकाऱ्यांसमवेत जपानी तज्ज्ञ तलावांचा, नद्यांचा व पाणी साचणाऱ्या परिसरांचा अभ्यास दौरा करून नंतर त्याविषयीचा अहवाल सादर करणार आहेत.

चहूबाजूने समुद्र आणि मुंबईचा बशीसारखा आकार अशा विशिष्ट भौगोलिक परिस्थितीमुळे पावसाळ्याच्या काळात काही परिसरांमध्ये पाण्याचा निचरा होण्यास वेळ लागतो. पावसाच्या पाण्याचा निचरा अधिक जलद गतीने व्हावा यासाठी महानगरपालिके ने आतापर्यंत अनेक उपाययोजना केल्या. त्यापैकी ब्रिमस्ट्रोव्ॉड प्रकल्पांतर्गत पंपिंग स्टेशन्स उभारण्यात आली आहेत. तसेच नद्या व नाल्यांचे रुंदीकरण करण्यात आले. मात्र अद्यापही मुंबईत पाणी तुंबण्याची समस्या सुटलेली नाही.  यंदाच्या पावसाळ्यात सातत्याने झालेल्या मुसळधार पावसामुळे काही ठिकाणी पाण्याचा निचरा होण्यास वेळ लागला. परिणामी, नागरिकांना विविध अडचणींना सामोरे जावे लागले. त्यामुळे पालिकेने आता जपानी तंत्रज्ञान मुंबईच्या समस्येवर उपयोगी पडते का हे पाहायचे ठरवले आहे. त्याकरिता जपानी तंत्रज्ञ सोमवारी पालिका मुख्यालयात आले होते.

टोक्यो शहराच्या धर्तीवर बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातदेखील अशा प्रकारची उपाययोजना राबविता येऊ  शकते काय? या अनुषंगाने चाचपणी करण्यासाठी बैठकीदरम्यान चर्चा झाली. जपानचे तज्ज्ञ महापालिकेच्या अधिकाऱ्यांसमवेत पवई, विहार, तुळशी तलाव, मिठी नदी आणि तत्सम भागांचा अभ्यास दौरा करणार आहेत. याचा अहवाल पालिकेला सादर करण्यात येईल. पावसाचे पाणी मोठमोठय़ा जलबोगद्यांमध्ये साठविण्याचा प्रकल्प मुंबईत राबवायचा झाल्यास ‘जपान इंटरनॅशनल को-ऑपरेटिव्ह एजन्सी’ची मदत मिळविण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल.

पावसाचे पाणी पिण्यासाठी?

टोकियोमध्ये जमिनीखाली मोठे जलबोगदे तयार करून त्यात पावसाचे पाणी साठवून नंतर ते समुद्रात सोडले जाते. यामुळे टोकियो शहर पूरमुक्त झाले आहे. मुंबईत अशा प्रकारचा प्रकल्प राबवायचा झाल्यास बोगद्यातील पाणी समुद्रात सोडण्याचा पर्याय खुला ठेवून ते पिण्यासाठी वापरता येऊ  शकेल का, याविषयी अभ्यास करण्याच्या सूचना महापालिका आयुक्तांनी बैठकीदरम्यान संबंधित तज्ज्ञांना दिल्या आहेत.