प्रत्येक बोक्यासाठी ८०० तर मांजरीसाठी एक हजार रुपये मोबदला

मुंबई : रस्त्यावर उपद्रव करणाऱ्या मोकाट कुत्र्यांचे निर्बीजीकरण करण्याचा कार्यक्रम रखडला असताना मुंबई महापालिकेने शहरातील मोकाट मांजरांचे निर्बीजीकरण करण्याची योजना आखली आहे. चार संस्थांची त्यासाठी निवड करण्यात आली असून येत्या महिनाभरात ही मोहीम हाती घेण्यात येणार आहे. या संस्थांना एका बोक्यामागे ८०० तर एका मांजरीमागे १००० रुपये मोबदला पालिका देणार आहे.

कोणत्याही कार्यालयाचे कँटिन, मच्छीमार्केट, चाळी असो, पायात घुटमळणाऱ्या मांजरींची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. श्वान हा प्राणी आक्रमक असल्यामुळे त्याचे निर्बीजीकरण करण्याची योजना अनेक वर्षांपासून सुरू आहे. मात्र मांजरींचा त्या तुलनेत उपद्रव नसल्याने त्यांच्या निर्बीजीकरणाकडे सरकारी यंत्रणांनी फारसे लक्ष दिले नाही. परंतु वाढत्या संख्येमुळे मांजरांच्याच खाद्यसुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाने मांजरांचे निर्बीजीकरण करण्याचा निर्णय घेतला. वडाळ्यात राहणाऱ्या सोफी जग्गी या तरुणीने यासाठी सरकारी पातळीवर सातत्याने पाठपुरावा केला. त्यानंतर याबाबत पालिकेत ठराव मंजूर करण्यात आला. मांजरांच्या निर्बीजीकरणासाठी निविदा प्रक्रिया राबवून चार संस्थांची निवड करण्यात आली आहे. आता या संस्थांबाबतच्या प्रस्तावाला स्थायी समिती व पालिकेच्या सभागृहाची परवानगी मिळाल्यानंतर प्रत्यक्ष कामास सुरुवात होईल. येत्या महिनाभरात हे काम सुरू होईल, अशी माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली.

महानगर पालिकेने मांजरांच्या नसबंदीसाठी संस्थांना आमंत्रित केले होते. त्यात पुढे आलेल्या सात संस्थांपैकी चार संस्थांची निवड झाली आहे. त्यात परळचे ‘पशुवैद्यकीय महाविद्यालय’, ‘इन डिफेन्स ऑफ अ‍ॅनिमल’, ‘युनिव्हर्सल अ‍ॅनिमल वेल्फेअर सोसायटी’, ‘अ‍ॅनिमल अ‍ॅण्ड बर्डकेअर अ‍ॅण्ड अ‍ॅडव्हान्स रिसर्च सेंटर’ या संस्थांचा समावेश असल्याची माहिती पालिकेचे अधिकारी डॉ. योगेश शेटय़े यांनी दिली.

प्राणीमित्रांचा पाठिंबा

दर तीन महिन्यांनी मांजर चार ते पाच पिल्लांना जन्म देत असते. मांजराची संख्या खूप वाढल्यामुळे मांजरांना खायलाही मिळत नाही, मांजरांच्या रडण्याला व विव्हळण्याला कंटाळून अनेक ठिकाणी मांजरांना शारीरिक इजा केल्या जातात, मारून टाकले जाते. नाहीतर गाडय़ांखाली येऊन, कुठेतरी फटीत अडकून मांजरांचा जीव जातो. त्यामुळे निर्बीजीकरण आवश्यक असल्याचे प्राणीमित्रांचे म्हणणे आहे.