कानांमध्ये हेडफोन्स लावून एफ.एम. किंवा गाणी ऐकण्यात गुंग असताना रस्ता ओलांडतेवेळी होणा-या अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. हीच बाब ध्यानात घेऊन मुंबई महापालिकेने आपल्या सर्वसाधारण सभेत एक निवेदन संमत केले असून, सदरप्रश्नी सार्वजनिक ठिकाणी हेडफोन्स वापरण्यासंबंधी बंदी घालण्याच्या अभियानाला संमती देण्यात आली आहे.
ताडदेव परिसरातील डी-वॉर्डाचे शिवसेना नगरसेवक अरविंद दुधवडकर यांनी ही संकल्पना मांडली आहे.
हेडफोन्स वापरणा-या व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी होणा-या कोणत्याही सूचना ऐकत नाहीत. ही अतिशय गंभीर बाब असून त्याचे दुष्परिणाम रस्ते अपघातात दिसून येतात. यासंबंधी भित्तीपत्रके, रेडिओ आणि टिव्ही जाहिरातींद्वारे जनजागृती करण्याची आवश्यकता असून तसे निवेदन आम्ही महापालिकेकडे सादर केले असल्याचे दुधवडकर म्हणाले. जून महिन्यामध्ये दादर-टीटी रस्त्यावर एका १७ वर्षीय मुलाचा कानाला हेडफोन्स लावून रस्ता ओलांडताना मृत्यू झाला होता.             
सुरक्षेच्या दृष्टीने हे अतिशय लोकोपयोगी निवेदन आहे, असं मुंबईचे महापौर सुनिल प्रभू म्हणाले. परंतू अशा प्रकारचे कोणतेही अभियान सुरू करण्याआधी आम्ही वाहतूक पोलिस आणि या विषयाशी संबंधित लोकांशी सविस्तरपणे बोलणार आहोत, असं ते पुढे म्हणाले.