मुंबई महापालिकेची योजना; खतांची प्रतवारी तपासण्यासाठी संस्थेची नियुक्ती

प्रसाद रावकर, मुंबई</strong>

मुंबईमधील गृहनिर्माण सोसायटय़ा, मोठय़ा संस्थांनी कचऱ्यापासून तयार केलेले खत शेतकऱ्यांना तूर्तास विनामूल्य उपलब्ध करण्याची योजना पालिकेने आखली आहे. ही योजना यशस्वी करण्यासाठी मुंबईकरांना ताजी सेंद्रीय भाजी उपलब्ध करण्यासाठी आठवडा बाजाराच्या निमित्ताने मुंबईत येणाऱ्या शेतकऱ्यांची मदत घेण्यात येणार आहे. ही योजना यशस्वी झाल्यास मुंबईतील सोसायटय़ा आणि बळीराजाला मोठी मदत होणार आहे.

कचरा निर्माण होणाऱ्याच ठिकाणी त्याची विल्हेवाट लागावी, कचराभूमीवरील कचऱ्याचा भार कमी व्हावा या उद्देशाने पालिकेने २० हजार चौरस मीटर क्षेत्रफळावर उभ्या असलेल्या, तसेच प्रतिदिन १०० किलो कचरा निर्माण होत असलेल्या सोसायटय़ा, मोठय़ा संस्था, हॉटेल्स, लॉल्स आदींना कचऱ्यापासून खत निर्मिती करणे बंधनकारक केले आहे.ोजघडीला मुंबईमधील सुमारे ९५० सोसायटय़ा कचऱ्यापासून खत निर्मिती करीत आहेत. आजघडीला या सोसायटय़ांमध्ये मोठय़ा प्रमाणावर खत तयार झाले असून यापैकी काही खताचा वापर सोसायटीच्या आवारातील बगीचासाठी करण्यात येत आहे. मात्र सोसायटीच्या आवारात मोठय़ा प्रमाणावर उर्वरित खत पडून आहे. या खताचे करायचे काय असा सोसायटय़ांना पडला आहे. हे खत शेतकऱ्यांना तूर्तास विनामूल्य उपलब्ध करुन देण्याचा पालिकेचा मानस आहे.

मुंबईकरांना ताजी सेंद्रीय भाजी मिळावी यासाठी मुंबईत ठिकठिकाणी आठवडा बाजार भरविण्यात येत आहे. गेले अनेक महिने शेतकरी दर आठवडय़ाला नित्यनियमाने ताजी सेंद्रीय भाजीची मुंबईतील नियोजित आठवडा बाजारात विक्री करीत आहे. शेतकरी टेम्पो भरुन भाजी घेऊन मुंबईत येतात. मात्र भाजीची विक्री झाल्यानंतर रिकामा टेम्पो घेऊन ते परतीची वाट धरतात. सोसायटय़ा, संस्था आदींनी कचऱ्यापासून तयार केलेले खत याच टेम्पोतून गावातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याची योजना पालिकेने आखली आहे.

सोसायटय़ा आणि खत घेऊन जाणाऱ्या शेतकऱ्यांशी समन्वय साधण्याची जबाबदारी पालिकेच्या २४ विभाग कार्यालयातील सहाय्यक आयुक्तांवर सोपविण्यात येणार आहे. सोसायटय़ा, संस्था आदींनी तयार केलेले खत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी यंत्रणा उभी करण्यात आठवडा बाजारासाठी मुंबईत येणाऱ्या शेतकऱ्यांची मोलाची मदत होणार आहे. सुरुवातीला काही काळ हे खत गावातील शेतकऱ्यांना विनामूल्य उपलब्ध करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

आठवडा बाजारात सेंद्रीय भाजीपाल्याची विक्री करण्यासाठी नित्यनियमाने शेतकरी मुंबईत येतात. भाजी विकून झाली की रिकामे टेम्पो घेऊन ते आपल्या गावी निघून जातात. सोसायटय़ा, संस्था, मॉल्स आदींनी तयार केलेले खत शेतकऱ्यांच्या टेम्पोतून गावाकडील शेतकऱ्यांना उपलब्ध करण्याचा पालिकेचा मानस आहे. त्यामुळे कचऱ्यापासून तयार होणाऱ्या खताचा प्रश्न सुटेल आणि शेतकऱ्यांनाही ते उपलब्ध होऊ शकेल.

– प्रवीणसिंह परदेशी, पालिका आयुक्त