आणखी २० टक्केनिधी कपातीमुळे खातेप्रमुख चिंतित

प्रसाद रावकर, लोकसत्ता

मुंबई : करोना संसर्गामुळे वाढणारा खर्च आणि उत्पन्नात हवी तशी होत नसलेली वाढ यामुळे चालू आर्थिक वर्षांच्या अर्थसंकल्पात विविध खात्यांच्या निधीला कात्री लावण्यात आली आहे. आता पुन्हा एकदा संगणकीय प्रणालीत विविध खात्यांच्या निधीत आणखी सुमारे २० टक्क्यांची कपात करण्यात आली आहे. परिणामी, निधीअभावी पावसाळापूर्व आणि पावसाळ्यातील कामांचा खोळंबा होण्याची भीती व्यक्त होत आहे.

मुंबईमध्ये करोना संसर्गाने हातपाय पसरायला सुरुवात केल्यानंतर रुग्ण सेवेसाठी मोठय़ा प्रमाणावर निधी खर्च करण्यात येत आहे. टाळेबंदी, संचारबंदी, कडक निर्बंध आदींमुळे नागरिकांचे आर्थिक गणित बिघडले आहे. पालिकेच्या उत्पन्नावरही परिणाम झाला आहे.  ही बाब लक्षात घेत प्रशासनाने पालिकेच्या २०२१-२२ या आर्थिक वर्षांच्या अर्थसंकल्पात प्रत्येक विभागाला दिलेल्या निधीमध्ये मागणीच्या तुलनेत २५ ते ३० टक्के कपात केली आहे. ही बाब लक्षात घेऊनच खातेप्रमुखांनी आगामी वर्षांतील कामांचे नियोजन केले होते. अर्थसंकल्पात तरतूद केलेल्या निधीच्या तुलनेत सॅप प्रणालीत विभागाच्या नावावर सुमारे २० टक्के निधी कमी जमा झाल्याचे पाहून खातेप्रमुखांना धक्काच बसला आहे.

पावसाळा जवळ येत असून विविध विभागांना पावसाळापूर्व आणि प्रत्यक्षात पावसाळ्यात मनुष्यबळाची, साधनसामग्रीची गरज भासते. छोटय़ा नाल्यांची सफाई विभाग कार्यालयांच्या स्तरावर केली जाते. या कामासाठी पालिकेकडे मनुष्यबळ नसल्यामुळे कंत्राटी कामगार घ्यावे लागतात. धूम्रफवारणी, डास निर्मूलन आदी विविध कामांसाठी सामाजिक संस्थांच्या कामगारांवर अवलंबून राहावे लागते. त्याचबरोबर काही कामांसाठी कंत्राटी पद्धतीने वाहने आणि अन्य यंत्रसामग्रीही घ्यावी लागते. प्रशासनाने अर्थसंकल्पात २५ ते ३० टक्के आणि आता सॅपमध्ये थेट २० टक्के निधीची कपात केल्यामुळे निम्म्या निधीच्या आधारे वर्षभर कामे कशी रेटायची असा प्रश्न खातेप्रमुखांसमोर निर्माण झाला आहे. काटकसर करण्यासाठी मनुष्यबळ कमी घेतल्यास कामाचा उरका होणे अवघड आहे. आवश्यक यंत्रसामग्री वा आवश्यक बाबी तुलनेत कमी घेतल्या तरीही त्याचा कामावर परिणाम होण्याची शक्यता काही खातेप्रमुखांनी नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितली.

कामे खोळंबणार..

प्रत्येक कामासाठी मनुष्यबळाची संख्या, त्यांचे किमान वेतन निश्चित आहे. डास निर्मूलनासारखी कामे योग्य वेळी होऊ शकली नाहीत तर साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव होऊन त्याचे परिणाम भविष्यात भोगावे लागतील. तसेच विभाग कार्यालयाच्या पातळीवर करण्यात येणारी नालेसफाईची कामे मनुष्यबळाअभावी पूर्ण होऊ शकली नाहीत, तर सखल भाग जलमय होऊन नागरिकांना फटका बसू शकेल. पूर नियंत्रणासाठी आवश्यक सामग्रीत कपात केल्यास त्याचाही फटका बसू शकेल, असे या अधिकाऱ्याने सांगितले. करोनाविषयक कामांवर मोठा निधी खर्च होत आहे. परंतु पावसाळापूर्व आणि पावसाळ्यात के ल्या जाणाऱ्या कामांच्या निधीची कपात करू नये, असेही या अधिकाऱ्याचे म्हणणे आहे.