मसुदा लेखा विभागाच्या छाननीच्या प्रतीक्षेत

प्रसाद रावकर, लोकसत्ता

मुंबई : मुंबई महापालिकेच्या भाडेकरूंच्या भाडेवाढीच्या मालमत्ता विभागाच्या मसुद्याची छाननी अद्याप लेखा विभागाकडून होऊ न शकल्याने सुधारित घरभाडय़ाची अंमलबजावणी लांबणीवर पडण्याची चिन्हे आहेत. प्रस्ताव मंजूर  झाल्यास दर महिना साधारण ३०० ते ३५० रुपये घरभाडे भरावे लागणार आहे.

पालिकेच्या मालकीच्या काही मालमत्ता शहरात आहेत. या भाडेकरूंकडून पालिकेला नाममात्र भाडे मिळते. निवासी, व्यावसायिक आणि औद्योगिक गाळेधारक असे मिळून साधारण ५० हजार भाडेकरू आहेत. मात्र, इमारतींमधील स्वच्छता, दिवाबत्ती, छोटी-मोठी दुरुस्ती, रंगरंगोटी आदी विविध कामे पालिकेलाच करावी लागतात. पालिकेने १९५५, १९९८ आणि २०१४मध्ये भाडेवाढ केली. तरीही आजघडीला निवासी भाडेकरूंकडून प्रति महिना के वळ ५० ते ५५ रुपये भाडे मिळत आहे. तुलनेत इमारतीच्या देखभालीचा खर्च अधिक आहे. ही बाब लक्षात घेऊन आता पालिकेने पुन्हा आपल्या भाडेकरूंच्या भाडय़ात वाढ करण्याचा निर्णय घेतला.

मालमत्ता विभागाने तयार केलेला मसुदा दीड-दोन महिन्यांपूर्वी पालिकेच्या लेखा विभागाकडे छाननीसाठी पाठविला. मात्र भाडय़ातील सुधारणांबाबत अद्याप छाननी झालेली नाही. त्यामुळे प्रस्ताव अद्याप लेखा विभागातच रेंगाळला आहे. लेखा विभागाने छाननी केल्यानंतर तो प्रस्ताव आयुक्तांकडे सादर करण्यात येईल.

आयुक्तांनी प्रस्तावास मंजुरी दिल्यानंतर तो स्थायी समिती आणि पालिका सभागृहाच्या पटलावर सादर करण्यात येणार आहे. लेखा विभागाची छाननी पूर्ण झाल्यानंतर आयुक्त, स्थायी समिती आणि पालिका सभागृहाच्या मंजुरीसाठी साधारण एक महिन्याचा कालावधी लागेल. या सर्वानी मंजुरी दिल्यानंतरच भाडेवाढीचा मार्ग मोकळा होईल. तोपर्यंत इमारतींवरील देखभालीचा आर्थिक भार पालिकेलाच वाहावा लागणार आहे.

भाडेवाढ अशी होईल..

प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर निवासी भाडेकरूला प्रतिचौरस फूट ३ रुपये दराने भाडे भरावे लागेल. तर व्यावसायिक भाडेकरूंकडून प्रतिचौरस फूट पाच रुपये, तर औद्योगिक भाडेकरूंकडून प्रतिचौरस फूट चार रुपये दराने भाडे वसूल करण्यात येईल. भाडेवाढ मंजूर झाल्यानंतर दर महिन्याला ३०० ते ३५० रुपये भाडे आकारण्यात येईल, असा अंदाज पालिका अधिकाऱ्यांनी नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितले.