कारवाईचा बडगा उचलताच थकबाकीदार जाग्यावर

मुंबई : गेल्या काही वर्षांपासून मालमत्ता कर न भरणाऱ्या बड्या थकबाकीदारांविरोधात पालिकेने धडक कारवाई सुरू के ली असून कारवाईमुळे थकबाकीदारांचे धाबे दणाणले आहेत. पालिके ने कारवाईचा बडगा उचलताच वरळीतील एका व्यावसायिकाने तब्बल २८ वर्षांपासून थकविलेला मालमत्ता कर तात्काळ पालिकेच्या तिजोरीत जमा केला. तसेच बोरिवलीत एका गृहनिर्माण संस्थेने जलजोडणी खंडित होण्याच्या भीतीने थकीत कराची रक्कम भरली. थकीत मालमत्ता करवसुलीसाठी पालिकेने जप्ती, अटकावणी, जलजोडणी खंडित करणे अशा स्वरूपाच्या कारवाईबरोबरच थकीत रकमेवर दोन टक्के  दंड आकारण्यास सुरुवात के ली आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून मालमत्ता कर थकविणाऱ्या थकबाकीदारांविरोधात पालिकेने धडक कारवाई सुरू केली आहे. वरळी परिसरातील थकबाकीदार मालमत्ताधारकावर पालिकेने कारवाईचा बडगा उगारताच तब्बल २८ वर्षांपासून थकीत असलेली कराची रक्कम त्याने पालिकेच्या तिजोरीत जमा केली. वरळी परिसरात ‘मे. नॅशनल कॉटन प्रॉडक्ट’ या नावाने कर निर्धारित असलेल्या सहा व्यावसायिक गाळ्यांचा मालमत्ता कर १९९२ पासून थकीत होता. ही रक्कम रुपये तीन कोटी ६१ लाख ४७ हजार ३८ इतकी होती. कर निर्धारण व संकलक खात्याने  कारवाईचा बडगा उगारताच मालमत्ताधारकाने थकीत रकमेचा धनादेश पालिका अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केला.

अन्य एका घटनेत  बोरिवली पूर्व परिसरात एका गृहनिर्माण सोसायटीने १६ लाख २४ हजार ६० रुपये मालमत्ता कर थकवला होता.  यामध्ये १ लाख ५६ हजार ६२२ रुपये इतक्या दंडाच्या रकमेचाही समावेश होता. त्यामुळे पालिके ने सोसायटीची जलजोडणी खंडित करण्याची कारवाई करण्याचा निर्णय घेतला होता. कारवाईची माहिती मिळताच गृहनिर्माण सोसायटीने दंडासह थकीत रकमेचा भरणा पालिकेकडे के ला, अशी माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली.

मुलुंडमधील ‘वर्धन हॉल’ने ९५ लाख ७८ हजार ४०९ रुपये मालमत्ता कर थकविला होता. तसेच घाटकोपर येथील ‘दीप्ती सॉलिटेअर कमर्शिअल प्रॉपर्टी व श्रीपाल कॉम्प्लेक्स कमर्शिअल प्रॉपर्टी’ यांच्याकडे अनुक्रमे १७ लाख ३९ हजार ५३६ रुपये आणि ४९ लाख २२ हजार ३७५ रुपये मालमत्ता कराची थकबाकी होती. वारंवार विनंती करून आणि नोटीस पाठवूनही मालमत्ता कराचा भरणा करण्यात न आल्याने या तिन्ही मालमत्तांची जलजोडणी खंडित करण्यात आली.

सध्या सुरू असलेल्या मालमत्ता करवसुली मोहिमेंतर्गत थकबाकीदारांना कर भरण्यासाठी विनंती करण्यात येत असून त्यानंतरच्या टप्प्यात नोटीस देण्यात येत आहे. मात्र, जे मालमत्ताधारक वारंवार विनंती करून आणि नोटीस पाठवूनही मालमत्ता कर भरत नाहीत, त्यांची जलजोडणी खंडित करणे, चारचाकी वाहने-वातानुकूलन यंत्रणा यांसारख्या महागड्या वस्तू जप्त करणे, अशा स्वरूपाची कारवाई करण्यात येत आहे. तसेच चालू आर्थिक वर्षापासून मालमत्ता कराच्या थकीत रकमेवर दरमहा दोन टक्के यानुसार दंड आकारणी करण्यात येत आहे.  त्यामुळे दंड आकारणी होऊ नये, यासाठी मालमत्ता कर वेळेत भरावा, असे आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे.

दीड हजार कोटींची तूट

आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये पालिके ने पाच हजार २०० कोटी मालमत्ता कर जमा करण्याचे लक्ष्य ठेवले असून आजपर्यंत तीन हजार ७०४ कोटी मालमत्ता कर जमा झाला आहे. अजून दीड हजार कोटींची तूट असून येत्या पंधरा दिवसांत या वसुलीचे लक्ष्य गाठावे लागणार आहे.

‘२ टक्के  दंडाचा आदेश स्थगित करा’

मालमत्ता कराच्या थकीत रकमेवर आवर्ती पद्धतीने दरमहा २ टक्के  दंड वसूल करण्याचा आदेश स्थागित करावा अशी मागणी समाजवादी पक्षाचे गटनेते आमदार रईस शेख  यांनी के ली आहे. मालमत्ता कराशी संबंधित प्रकरणे न्यायालयात प्रलंबित असताना पालिके ने ८ मार्चपासून थकबाकीदारांवर २ टक्के  दंड आकारण्यास सुरुवात करणे चूक आहे, असे शेख यांनी सांगितले. तसेच टाळेबंदीमुळे आधीच नागरिकांची आर्थिक परिस्थिती बिघडलेली असताना त्यांच्याकडून जबरदस्ती कर वसूल करणे योग्य नाही. त्यामुळे कर वसुली तात्काळ थांबवावी, अशी मागणी त्यांनी पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल व महापौर किशोरी पेडणेकर यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.