अर्थसंकल्पाच्या ५० टक्के रक्कम थकीत

मुंबई :  पालिकेने भांडवली मूल्याधारित करप्रणाली स्वीकारल्यापासून पालिकेची मालमत्ता कराची थकबाकी २०१२ पासून वाढू लागली असून यंदा ती तब्बल १६,१६७ कोटींवर पोहोचली आहे. २०१२ मध्ये भांडवली करप्रणाली लागू होण्यापूर्वीची केवळ २२१८ कोटींची थकबाकी असून त्यानंतरची थकबाकी १३ हजार ९४९ कोटींवर गेली आहे. न्यायालयीन प्रकरणांमुळे व वादांमुळे पालिकेची ही थकबाकी वाढतच आहे.

भाडे मूल्याधारित करप्रणाली बंद करून पालिकेने २०१० मध्ये भांडवली मूल्याधारित करप्रणाली आणली. प्रत्यक्षात २०१२ पासून या पद्धतीचा अवलंब करण्यात आला. मात्र तेव्हापासून पालिकेच्या मालमत्ता कर विभागाला गळती लागली आहे. तक्रार निवारण करण्यात आलेल्या अपयशामुळे पालिकेच्या मालमत्ता कराच्या वसुलीची थकबाकी त्यानंतर प्रत्येक वर्षी वाढतच गेली. २०१० मध्ये पालिकेची मालमत्ता कराची संचित थकबाकी ६३५० कोटींची होती. गेल्या आठ वर्षांत ही संचित थकबाकी आता १६ हजार कोटींवर गेली आहे.

ही थकबाकी आता पालिकेच्या गळ्यापर्यंत आली आहे. त्यामुळे यावर्षी पालिकेने युद्धपातळीवर मालमत्ता कराच्या वसुलीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. मालमत्तांच्या वापरातील बदलाचे निरीक्षण करून त्यानुसार करनिर्धारण करून नव्याने देयके पाठवण्यास सुरुवात केली आहे. थकबाकी असलेल्या मालमत्ता जप्ती, अटकावणी, जलजोडणी खंडित करणे अशी कारवाई सुरू करण्यात आली आहे.

गेल्यावर्षी एक हजार मालमत्तांवर जप्ती आणली होती. यावर्षी जानेवारीपर्यंतच दोन हजार मालमत्तांवर जप्तीची कारवाई करण्यात आली आहे.