मालमत्ता कर वसुलीचे लक्ष्य पूर्ण करणे कठीण; पालिका तिजोरीकडे येणारा ओघ आटला

प्रसाद रावकर, लोकसत्ता

मुंबई : देशातील काही राज्यांपेक्षाही जास्त आकडय़ांचा अर्थसंकल्प असलेला मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प यंदा गडगडण्याची शक्यता आहे. पालिकेच्या उत्पन्नात झालेली घट, मालमत्ता कराचे उद्दिष्टय़ गाठण्यात आलेले अपयश या पार्श्वभूमीवर महापालिकेचा आगामी अर्थसंकल्प गतवर्षीच्या तुलनेत कमी असेल, अशी शक्यता आहे. अर्थसंकल्पातील तरतुदींना कात्री लावताना लहान प्रकल्प आणि नागरी कामांवर गंडांतर येण्याची शक्यताही व्यक्त होत आहे.

जकात कर हा मुंबई महापालिकेच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत होता. मात्र देशात वस्तू आणि सेवा कराची अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर जकात कर बंद करण्यात आला. जकात बंद झाल्यानंतर सर्वाधिक उत्पन्न मिळवून देणाऱ्या मालमत्ता कराच्या वसुलीवर पालिकेने लक्ष केंद्रीत केले होते. मात्र मालमत्ता कराच्या वसुलीचे उद्दिष्टय़ गाठण्यात पालिकेला अपयश आले आहे.

पालिकेला २०१८-१९ या वर्षांत मालमत्ता कराच्या वसुलीतून ५०४४ कोटी रुपये उत्पन्न मिळाले होते. मागील वर्षांच्या उत्पन्नात १० टक्क्यांनी वाढ करून आगामी वर्षांचे मालमत्ता कराच्या वसुलीचे उद्दिष्टय़ निश्चित केले जाते. त्याप्रमाणे २०१९-२० या वर्षांत ५८४४.९४ कोटी रुपये मालमत्ता कराच्या वसुलीचे लक्ष्य डोळ्यासमोर ठेवण्यात आले होते. मात्र २० जानेवारी २०२० पर्यंत पालिकेच्या करनिर्धारण व संकलन विभागाला मालमत्ता करापोटी २३९४.३८ कोटी रुपये वसूल करता आले.  एकूण उद्दिष्टाच्या तुलनेत ५० टक्के रक्कमही पालिकेच्या तिजोरीत जमा होऊ शकलेली नाही.   या पार्श्वभूमीवर आगामी अर्थसंकल्पातील रकमांना कात्री लागण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

मुंबई महापालिकेचा २०१५-१६ या आर्थिक वर्षांचा अर्थसंकल्प २६,४७९.१५ कोटी रुपयांचा होता. पालिकेच्या २०१६-१७ वर्षांच्या अर्थसंकल्पाने ३७,०५२.१५ कोटी रुपयांवर उसळी घेतली होती. प्रस्तावित तरतुदी आणि प्रत्यक्षात झालेला खर्च यामध्ये प्रचंड तफावत असल्याचे आढळून आले होते. अर्थसंकल्प आकडेवारीद्वारे फुगविण्यात आल्याची टीका त्यावेळी झाली होती. परिणामी, २०१७-१८ च्या अर्थसंकल्पात १२ हजार कोटींनी घट झाली होती. या वर्षांत २५,१४१ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता. त्यानंतर हळूहळू अर्थसंकल्पाने उसळी घ्यायला सुरुवात केली. चालू आर्थिक वर्षांसाठी ३०,६९२.५९ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता. मात्र चालू आर्थिक वर्षांत मालमत्ता करासह विकास नियोजन शुल्क आणि अन्य उत्पन्नांमध्ये घट झाली आहे. यामुळे आगामी वर्षांच्या अर्थसंकल्पाच्या आकारमानावर परिणाम होण्याची चिन्हे असल्याची भीती व्यक्त होऊ लागली आहे.

उत्पन्नाच्या नव्या स्रोतांचा विचार

आगामी काळात हाती घेण्यात येणारे प्रकल्प आणि उत्पन्नात होत असलेली घट लक्षात घेऊन पालिकेने उत्पन्नाचे नवे स्रोत शोधण्यास सुरुवात केली आहे. पालिकेच्या मालमत्तांचा विकास करुन त्याद्वारे उत्पन्न मिळविण्याचा विचार प्रशासन स्तरावर सुरू झाला आहे. यात यश मिळाल्यास पालिकेच्या उत्पन्नासाठी नवा स्रोत उपलब्ध होऊ शकेल, असे पालिका अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.