नऊ वर्षांत पहिल्यांदाच महापालिका यंत्रणेला यशाची अपेक्षा

शाळा सुरू होऊन तीन महिने उलटून गेले तरी शालेय साहित्य मिळत नाहीत म्हणून शिक्षण समिती सदस्यांपासून नगरसेवक पालिका प्रशासनाला धारेवर धरतात. मात्र, यावर्षी त्यांनी ही संधी मिळणार नसून शाळेच्या पहिल्या दिवशीच विद्यार्थ्यांना सर्व साहित्य पुरविले जाणार आहे. ही योजना वेळेवर राबविण्यात पालिका प्रशासनाला नऊ वर्षांत पहिल्यांदाच यश येण्याची अपेक्षा आहे.

पालिकेच्या काही शाळा सोमवारपासून सुरू झाल्या असून काही शाळा बुधवारपासून सुरू होणार आहेत. सर्व शाळा सुरू झाल्या की पहिल्या दिवशीच विद्यार्थ्यांना वह्य, पुस्तके, पेन्सिल याबरोबरच आवश्यक २७ प्रकारचे शैक्षणिक साहित्य पुरविले जाणार आहेत. यासाठीची आवश्यक ती तयारी पूर्ण झाली असून प्रशासन पूर्णत: सज्ज आहे, अशी माहिती पालिकेचे उपायुक्त रणजित ढाकणे यांनी स्पष्ट केले. शाळा सुरू होऊन पहिली परीक्षा घेण्याची वेळ येते तरी विद्यार्थ्यांना पुस्तके उपलब्ध होत नसे.

यामुळे पालिकेचा शिक्षण विभाग दरवर्षी या मुद्दय़ावरुन वादाच्या भोवऱ्यात सापडत असे.

यावर्षी विद्यार्थ्यांना वेळेवर साहित्य उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने पूर्व तयारी करुन विद्यार्थ्यांना वेळेवर साहित्य उपलब्ध करुन देण्यात पालिकेला यश येणार असल्याचेही ढाकणे म्हणाले. ही योजना लागू करुन नऊ वष्रे झाली आहेत. या कालावधीत पालिका प्रशासनाला वेळेवर साहित्य पुरविण्यात कधीच यश आले नव्हते. यामुळे यावर्षी तरी पालिकेने वेळेवर साहित्य पुरवावे यासाठी सातत्याने पाठ पुरावा सुरू असल्याचे शिक्षण समितीचे सदस्य शिवनाथ दराडे यांनी सांगितले.