|| प्रसाद रावकर

सहाय्यक आयुक्तांकडून आपल्या मुलीचे बालकोत्सवात लसीकरण

गोवर आजाराचे निर्मूलन आणि रुबेलावर नियंत्रण मिळविण्यासाठी केंद्र सरकारने हाती घेतलेल्या मोहिमेस मुंबईतील एका विशिष्ठ समाजाकडून सहकार्य मिळत नसल्यामुळे पालिकेच्या आरोग्य विभागासमोर यक्ष प्रश्न निर्माण झाला आहे. ही समस्या सोडविण्यासाठी कुर्ला परिसरातील नगरसेविकेने पुढाकार घेत आयोजित केलेल्या बालकोत्सवात पालिकेच्या ‘एल’ विभाग कार्यालयाच्या सहाय्यक आयुक्तांनी आपल्या एक वर्षांच्या बालिकेला सर्वासमक्ष व्यासपीठावरच गोवर, रुबेला लसीकरण करुन जनजागृतीच्या दृष्टीने एक पाऊल पुढे टाकले. हाच कित्ता गिरवीत उर्दू माध्यमाच्या शाळांमधील शिक्षकांनीही याच व्यासपीठावर आपल्या मुलांना लसीकरण करुन घेतले.

केंद्र सरकारने २०२० पर्यंत भारतातून गोवर आजाराचे समूळ उच्चाटान करण्याचे आणि रुबेलावर नियंत्रण मिळविण्याचा संकल्प सोडला आहे. भारतात दरवर्षी गोवरमुळे ५० हजार बालके दगावतात. रुबेलाची बाधा बालके आणि प्रोढांमध्येही होत आहे. गर्भवती महिलेस रुबेलाचा संसर्ग झाल्यास नवजात बालकांना अंधत्व, बहिरेपणा, हृदयविकृती होऊ शकते. वर्षांकाठी रुबेलाग्रस्त साधारण ४० हजार बालके जन्म घेतात. ही समस्या सोडविण्यासाठी केंद्र सरकारने देशभरातील नऊ महिने ते १५ वर्षे वयोगटांतील मुलांना गोवर, रुबेला लसीकरण करण्याची मोहीम हाती घेतली आहे.

पालिकेने मुंबईमध्ये २७ नोव्हेंबर २०१८ पासून ही मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत मुंबईतील ३० लाख ५० हजार मुलांना लसीकरण करण्यात येणार आहे. मात्र आतापर्यंत १५ लाख ४५ हजार मुलांना गोवर आणि रुबेलाची लस देण्यात आली आहे. या लसीकरणाबद्दल विशिष्ठ समाजामध्ये गैरसमज निर्माण झाला आहे. त्यामुळे अनेक पालकांनी आपल्या मुलांना लस देण्यास नकार दिला आहे. ही बाब लक्षात घेत मुंबईतील मुस्लिम समाजाच्या नगरसेवकांनी जनजागृती मोहीम हाती घेतली आहे.

कुर्ला परिसरातील तब्बल दोन लाख ७० हजार मुलांना लसीकरण करण्याचे उद्दीष्टय़ पालिकेसमोर आहे. मात्र आतापर्यंत केवळ नऊ हजार २०१ मुलांना लसीकरण करण्यात आले आहे. बहुतांश पालकांनी आपल्या मुलांना ही लस देण्यास स्पष्ट नकार दिला आहे. त्यामुळे पालिके समोर मोठ्ठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे या परिसरातील रहिवाशांमध्ये जनजागृतीसाठी मशीद, मदराशांमधील मधील मौलाना, उलेमा व विश्वस्तांची मदत घेण्यात येत आहे. तसेच विविध कार्यक्रम, उपक्रम, स्पर्धाच्या माध्यमातून या लसीकरणाचे महत्त्व पटवून देण्याची मोहीम पालिकेने हाती घेतली आहे.

कुर्ला परिसरातील प्रभाग क्रमांक १६८ मधील नगरसेविका सईदा खान यांनी आपल्या विभागातील १० शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी बुधवारी बालकोत्सवाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून माजी मंत्री नवाब मलिक उपस्थित होते. या शाळांमधील बहुसंख्य विद्यार्थी या बालकोत्सवात सहभागी झाली होते. पालक वर्गातील गैरसमज दूर करण्यासाठी पालिकेच्या ‘एल’ विभाग कार्यालयातील सहाय्यक आयुक्त मनिष वळंजू यांनी आपल्या एक वर्षांच्या बालिकेला बालकोत्सवाच्या व्यासपीठावरच गोवर, रुबेला लस दिली. वळंजू यांचा कित्ता गिरवत उर्दू माध्यमाच्या शाळांमधील चार शिक्षकांनीही आपल्या मुलांना याच व्यासपीठावर लसीकरण केले.

मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीने गोवर, रुबेला लसीकरण महत्त्वाची आहे. त्यामुळे पालकांनी आपल्या मुलांच्या सुदृढ आरोग्यासाठी पालिकेला सहकार्य करावे आणि मुलांना लस द्यावी.    – जितेंद्र जाधव, आरोग्य अधिकारी, ‘एल’ विभाग