News Flash

हरितपट्टय़ातील नागरी समस्या

मुंबईच्या उत्तरेला असलेल्या हा विभाग शिवसेनेच्या प्रभावक्षेत्रांपैकी एक आहे.

‘प्रभाग’फेरी – आर उत्तर वॉर्ड

अंतर्गत भाग :   बोरिवली पूर्व व पश्चिम

शतकानुशतके टिकलेल्या मंडपेश्वर गुंफा, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातून वाहणारी नदी, एका बाजूला खाडी आणि दुसऱ्या बाजूला अरण्य एवढे नैसर्गिक व ऐतिहासिक देणे लाभलेल्या दहिसरमध्ये आयसी कॉलनी, एलआयसी कॉलनी व पूर्वेकडे अशोकनगरच्या हिरव्यागार वसाहती आहेत, मात्र या संपत्तीचा म्हणावा तसा उपयोग नागरी वसाहतींना झालेला नाही. मंडपेश्वर गुंफांची स्थिती, दहिसर नदीची अवस्था व खारफुटीवर भराव टाकून जलद गतीने पसरलेले गणपत पाटील नगर यांचीच चर्चा अधिक होते. दहिसरमध्येही आता पुनर्विकासातून भल्या मोठय़ा इमारती उभ्या राहू लागल्या आहेत. मराठी व गुजरातीबहुल वस्ती असलेल्या या भागाने आजही मध्यमवर्गीय शांतपणा जपला आहे, एवढे मात्र निश्चित. कमी दाबाने पाणीपुरवठा, रस्त्यांवरील खड्डे, वाहनांची गर्दी या समस्या या विभागातही आहेत. मात्र विहिरींचे पुनरुज्जीवन, मंडपेश्वर गुंफांची सुधारणा, हरितपट्टय़ांचे संरक्षण आणि दहिसर नदीचे स्वच्छता अभियान यांची या विभागाला अधिक गरज आहे.

सेनेच्या बालेकिल्ल्यात भाजप शिरणार?

मुंबईच्या उत्तरेला असलेल्या हा विभाग शिवसेनेच्या प्रभावक्षेत्रांपैकी एक आहे. या विभागातील विद्यमान सातपैकी पाच नगरसेवक शिवसेनेचे आहे. मनसेचा एक आणि काँग्रेसचा एक नगरसेवक आहे. आता पुनर्रचनेत प्रभागांची संख्या सातवरून आठ झाली आहे. या आठपैकी तीन प्रभाग खुले झाले असून तीन ठिकाणी महिलांसाठी, तर दोन प्रभाग मागासवर्गीयांसाठी राखीव आहेत. या विभागातील शिवसेनेच्या दोन नगरसेविकांनी सेनेच्याच पुरुष नेत्याविरोधात बंड पुकारले होते. त्यामुळे अडीच वर्षांपूर्वी विधानसभेच्या निवडणुकीत सेनेऐवजी भाजपाला लॉटरी लागली. आता हे बंड थंडावले आहे. मराठी व गुजराती मध्यमवर्गीय असलेला हा परिसर आतापर्यंत सेनेच्या पाठीशी उभा राहिला आहे. मात्र निवडणुकांमध्ये युती झाली नाही तर पुनर्रचनेत वाढलेल्या वॉर्डाच्या माध्यमातून भाजपाचा प्रवेश होऊ शकेल.

तबेल्यांची समस्या

गोरेगावपासून दहिसपर्यंत अनधिकृत तबेल्यांमुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. शहराबाहेर पाठवण्याचे आदेश उच्च न्यायालयाने देऊनही नदी व नाल्यांच्या काठावर तबेले शिल्लक आहेत. गुरांचे वेळेत लसीकरण न करणे, शेण- मैला बाहेर टाकणे, गुरांच्या मृतदेहाची विल्हेवाट न लावणे या सगळ्यामुळे आजूबाजूच्या परिसरात आजारांची साथ येण्याची शक्यता आहे. मात्र पालिकेचे वॉर्ड कार्यालय, आरोग्य विभाग, प्रदूषण नियंत्रण मंडळ अशा अनेक यंत्रणांचे नियंत्रण असलेले तबेले प्रत्यक्षात अनियंत्रित आहेत.

प्रभागांच्या समस्या

दहिसर नदी की नाला?

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातून बाहेर पडणाऱ्या दहिसर नदीचा पुढचा प्रवास आर उत्तर विभागातून होतो. नदीचे जे जे काही वाईट होऊ शकते, ते ते सर्व दहिसर नदीच्या बाबत घडले आहे. शौचालयातून नदीत सोडला जाणारा मैला, तबेल्यातून टाकले जाणारे शेण, गुरांचे मृतदेह, धोबीघाटावरून येणारे साबणाचे पाणी, वस्तीतून उडवला जाणारा कचरा, नदीच्या पात्रात उभी राहिलेली बांधकामे.. दहिसर नदी मृतप्राय करण्यासाठी कोणतीही कसर शिल्लक ठेवलेली नाही. या नदीच्या सुशोभीकरणासाठी १५० कोटी रुपयांचा प्रकल्प आखण्यात आला. त्यानुसार संरक्षक भिंती व पूल बांधण्याचे काम सुरू आहे, मात्र त्यामुळे नदीचे बकालीकरण थांबेल का, हा प्रश्न अनुत्तरित आहे.

‘भगवती’चे भोग कधी संपणार?

विरारपासूनच्या रुग्णांसाठी आधार ठरलेले भगवती रुग्णालय गेले पाच वर्षे मोडकळीस आलेल्या अवस्थेत होते. या रुग्णालयाचे नूतनीकरण हाती घेण्यात आले असले तरी सध्या तरी त्याचे स्वरूप हे दवाखान्यापेक्षा अधिक नाही. या ठिकाणी परिचारिका महाविद्यालय सुरू करण्याची योजना आहे. मात्र हे सर्व होईपर्यंत पुढच्या पालिका निवडणुका येतील. सध्या तरी बोरिवली, दहिसरच्या नागरिकांना दक्षिण मुंबई गाठावी लागते. दवाखाने व आरोग्य केंद्राच्या सुविधा पालिकेच्या आरोग्य विभागाच्या कागदावरच प्रभावी वाटतात.

खारफुटीवरचे नगर

खारफुटीच्या जागेवर भराव टाकत वाढलेले गणपत पाटील नगर विकासाच्या वेगात महानगरीलाही मागे टाकणारे ठरले. या झोपडय़ांवर कारवाई करण्यासाठी पालिकेने मध्यंतरी जोरदार मोहीम सुरू केली होती. मात्र सध्या तरी या वस्तीला अभय मिळाले आहे. या वस्तीतील काही गल्ल्यांमध्ये विद्युतदिव्यांची सोय करण्यात आली आहे. जलवाहिन्या टाकण्यात आल्या आहेत. वस्तीमध्ये आठ हजार मतदार असल्याने लोकप्रतिनिधींना गणपत पाटील नगरकडे दुर्लक्ष करता येत नाही. मात्र तरीही नागरी सुविधांची वानवा आहेच. या वस्तीत राहणाऱ्या मुलांना आठवीपुढे शिक्षण घ्यायचे असल्यास तीन किलोमीटर दूर चालत जावे लागते.

विहिरी अजूनही गाळातच

दहिसर परिसरात विहिरींची संख्या खूप आहे, मात्र या विहिरी बुजलेल्या आहेत. दोन वर्ष दुष्काळसदृश स्थिती असताना या विहिरी पुन्हा खोदण्याचा विचार पालिका प्रशासनाने केला होता, मात्र त्यानंतर पाऊस आल्याने सर्व व्यवहार थंडावला. अजूनही अनेक विहिरी गाळाने भरलेल्या आहेत. आजूबाजूच्या वस्तीतून विहिरीत कचरा आणून टाकला जातो, त्यामुळे विहीर वेगळी ओळखणेही कठीण झाले आहे.

सध्याचे नगरसेवक

*प्रभाग १- अभिषेक घोसाळकर, शिवसेना

*प्रभाग २ – शीतल म्हात्रे, शिवसेना

* प्रभाग ३ – शीतल म्हात्रे, काँग्रेस

*प्रभाग ४ –  उदेश पाटेकर – शिवसेना

’प्रभाग ५ – प्रकाश दरेकर – मनसे

’प्रभाग ६ –  हंसाबेन देसाई – शिवसेना

’प्रभाग ७ – डॉ. शुभा राऊळ, शिवसेना

फेररचनेनंतरची प्रभाग रचना

*  प्रभाग १ (सर्वसाधारण महिला)

लोकसंख्या – ४९,९४०

गणपत पाटील नगर, बोरिवली आरटीओ, दहिसर नदी, आयसी कॉलनी

*  प्रभाग २ (खुला)

लोकसंख्या – ५६०१६

अवधूतनगर, आनंदनगर, एन. एल. संकुल, सुधींद्रनगर

*  प्रभाग ३ (खुला)

लोकसंख्या – ५७,४७१

केतकीपाडा, डायमंड इंडस्ट्रियल इस्टेट, वैशालीनगर, दहिसर चेकनाका

*  प्रभाग ४ (सर्वसाधारण महिला)

लोकसंख्या – ५९०८३

घरटनपाडा, कोकणीपाडा, एकतानगर,

रावळपाडा

* प्रभाग ५ (मागासवर्ग)

लोकसंख्या – ५८०४९

अशोकवन, चोगलेनगर, गणेशनगर, चिंतामणीनगर, एसटी आगार

*  प्रभाग ६ (मागासवर्ग)

लोकसंख्या – ५२७७३

रतननगर, आंबेवाडी,

ओवरीपाडा, मराठा कॉलनी, मानव कल्याण संघ

* प्रभाग ७ (सर्वसाधारण महिला )

लोकसंख्या – ४९१२५

दहिसर नदी, नवा गाव, कांदरपाडा

* प्रभाग ८ (खुला )

लोकसंख्या – ४८९११

मेरी इमॅक्युलेट शाळा, सेंट फ्रान्सिस शाळा, भगवती रुग्णालय, एलआयसी कॉलनी, मंडपेश्वर कॉलनी

आर उत्तर विभागातील अनेक भागांत चांगले पदपथ खोदून नवीन बांधकाम केले जात आहे, तर निधी नसल्याने रुस्तम रेसिडन्सीच्या आतील रस्त्यांवरील विद्युत दिवे सुरू करता येणार नाहीत, असे पालिकेच्या वॉर्ड कार्यालयाकडून सांगण्यात आले. गरज नसलेले पदपथ खोदून आणि गरज असूनही बंद असलेले दिवे यातून पालिकेचा कारभार दिसून येतो. डेंग्यू, मलेरिया पसरवणाऱ्या डासांना मारण्यासाठी धूम्रफवारणी करण्याची विनंती  वारंवार करूनही त्याला प्रतिसाद मिळत नाही.

– धनंजय जुन्नरकर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 29, 2016 3:55 am

Web Title: bmc r north ward civics issues
Next Stories
1 हृदयप्रत्यारोपणात सातपट वाढ
2 एसी लोकलची व्हॉट्सअ‍ॅपवर ‘धाव’
3 १३० किमी वेगाच्या लोकलला ब्रेक
Just Now!
X