दंडात्मक कारवाईसाठी तीन स्वतंत्र पथके तयार

प्लास्टिक बंदीबाबत व्यापारी व नागरिकांमध्ये फारसा उत्साह नसला तरी राज्य सरकारने दिलेली मुदत २३ जून रोजी संपत असल्याने पालिकेने दंडात्मक कारवाईसाठी तयारी सुरू केली आहे. बाजार, दुकाने आणि फेरीवाले अशा तीन विभागांमध्ये कारवाई करण्यासाठी तीन स्वतंत्र पथके तयार करण्यात आली आहेत.

राज्य सरकारने गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर लागू केलेल्या प्लास्टिक बंदीबाबत अनेकांनी आक्षेप नोंदवल्यावर २२ जूनपर्यंत तीन महिन्यांची मुदत देण्यात आली. ही मुदत येत्या दोन आठवडय़ांत संपत आहे. दरम्यानच्या काळात महापालिकेने जनजागृतीसाठी प्रयत्न केले त्याचप्रमाणे हेल्पलाइनच्या मदतीने नागरिकांकडील प्लास्टिक वस्तू गोळा करण्याचेही प्रयत्न झाले. महिनाभरात पालिकेकडे १२८ टन प्लास्टिक कचरा जमा झाला. आतापर्यंत लोकांना समजवण्याच्या प्रयत्नात असलेली पालिका २३ जूनपासून कारवाईचा बडगा उचलणार आहे.

प्लास्टिक पिशव्यांवर कारवाई करणाऱ्या निरीक्षकांना ओळखता यावे यासाठी त्यांना वेगळ्या रंगाचे जॅकेट देण्यात येणार असून ओळखपत्र लावणेही सक्तीचे केले जाणार आहे. त्यामुळे कोणत्याही गैरप्रकाराला जागा राहणार नाही. नागरिकांनी प्लास्टिकचा वापर टाळावा तसेच पालिकेने दिलेल्या हेल्पलाइनच्या माध्यमातून स्वत: जवळचे प्लास्टिक जमा करावे, असे आवाहनही निधी चौधरी यांनी केले आहे.

निरीक्षकांची यादी तयार

तीन विभागांच्या निरीक्षकांकडे कारवाईची जबाबदारी असून त्यांची नावे लवकरच पालिकेच्या संकेतस्थळावर जाहीर केली जातील, असे पालिकेच्या उपायुक्त (विशेष) निधी चौधरी यांनी ट्विटरवरून सांगितले. दुकानांमध्ये प्लास्टिकचा वापर करणाऱ्यांवर दुकान आणि आस्थापना विभागाचे निरीक्षक कारवाई करतील. मंडई व बाजारांमधील गाळे व विक्रेते यांच्यावर बाजार विभागातील निरीक्षक कारवाई करतील तर फेरीवाल्यांकडील प्लास्टिक पिशव्यांवर कारवाई करण्याची जबाबदारी परवाना विभागावर असेल. दुकाने आणि आस्थापना विभागातील निरीक्षकांची यादी तयार करण्यात आली असून इतर दोन विभागांच्या निरीक्षकांची यादी आयुक्तांच्या मान्यतेनंतर आठवडाभरात संकेतस्थळावर पाहता येईल.

हेल्पलाइन क्रमांक

  • प्लास्टिक कचरा आणि बंदी घातलेल्या प्लास्टिकच्या वस्तू गोळा करण्यासाठी महापालिकेचा हेल्पलाइन क्रमांक १८०२२२३५७ असा असून तो टोलफ्री आहे.
  • जे महिला बचत गट कापडाच्या, ज्यूटच्या आणि कागदी पिशव्या तयार करतात त्यांची यादीही महापालिकेने त्यांच्या संकेतस्थळावर जारी केली आहे.
  • प्लास्टिक वस्तू गोळा करण्याची केंद्रे : गेटवे ऑफ इंडिया, गिरगाव आणि जुहू चौपाटी, मीनाताई ठाकरे मंडई (दादर फुलबाजार), मंगलदास क्लोथ मार्केट, महात्मा ज्योतिबा फुले मंडई (क्रॉफर्ड मार्केट), चेंबूर मार्केट, फॅशन स्ट्रीट, चोर बाजार, हिंदमाता मार्केट, झवेरी बाजार, साईनाथ मार्केट (मालाड), घाटकोपर मार्केट, मुलुंड मार्केट, लोखंडवाला मार्केट आणि अन्य काही.