चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे महापालिकेच्या कामावर परिणाम होऊ लागल्याने येत्या चार महिन्यांत चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया राबवण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिकेने घेतला आहे. महापालिकेने २००९ मध्ये ४७४१ कर्मचाऱ्यांची भरती केली होती. त्यानंतर आजवर कर्मचारी भरण्यात आले नाहीत. पण त्याचवेळी निवृत्तीमुळे मोठय़ाप्रमाणावर कर्मचारी कमी झाले. त्यामुळे कर्मचाऱ्यांचा तुटवडा निर्माण होऊन कामावर परिणाम होण्यास सुरुवात झाली. या पाश्र्वभूमीवर कामगार खात्याकडे अहवाल मागण्यात आला होता. त्यानुसार अहवाल महापालिका प्रशासनाला सादर करण्यात आला. यानंतर चार महिन्यांत चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.