मुंबईच्या किनाऱ्यावर रविवारी ४.७२ मीटर उंचीच्या लाटा धडकण्याची शक्यता असल्याने पालिका अधिकाऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले होते. सहा समुद्रकिनाऱ्यांवर अग्निशमन दल, तसेच राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे (एनडीआरएफ) जवान आणि नागरी सुरक्षा दलाचे स्वयंसेवक तैनात करण्यात आले होते. मात्र पावसाने विश्रांती घेतल्यामुळे कोणताही अनुचित प्रकार न घडता रविवारचा दिवस मावळल्याने पालिका अधिकाऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
गेले काही दिवस कोसळलेल्या मुसळधार पावसात मुंबईतील अनेक रस्ते जलमय झाले आणि आपत्कालीन परिस्थिती हाताळताना पालिका अधिकाऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले होते. मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यावर २३ जून रोजी दुपारी १२.१४ च्या सुमारास ४.७२ मीटरची लाट धडकण्याच्या शक्यतेने तर पालिका अधिकाऱ्यांच्या छातीत धस्स झाले होते. पालिकेच्या विभाग कार्यालयांतील साहाय्यक आयुक्तांनी रविवारी सकाळपासून आपल्या कार्यालयात उपस्थित राहण्याचे आदेश पालिका आयुक्त सीताराम कुंटे यांनी दिले होते.
रविवारी मोठय़ा संख्येने पर्यटक समुद्रकिनाऱ्यांवर फिरावयास येतात. त्यामुळे गिरगाव, दादर, जुहू, वर्सोवा, अक्सा आणि गोराई या समुद्रकिनाऱ्यांवर अग्निशमन दल आणि एनडीआरएफचे जवान तैनात करण्यात आले होते. त्याचबरोबर नागरी सुरक्षा दलाचे १०० स्वयंसेवकही समुद्रकिनाऱ्यांवर होते.
रविवारी काही ठिकाणी पर्यटक समुद्रात उतरत होते. मात्र अग्निशमन दल, एनडीआरएफचे जवान आणि स्वसंसेवक विनंती करीत पर्यटकांना समुद्रात उतरण्यापासून रोखत होते. पर्यटकांनी सहकार्य केल्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही, असे पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाचे प्रमुख अधिकारी महेश नार्वेकर यांनी सांगितले.
मुंबईकरांना सावधानतेचा इशारा
२३ ते २८ जून या काळात दररोज समुद्रकिनाऱ्यावर साडेचार मीटरपेक्षा अधिक उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे समुद्रकिनाऱ्यावर फिरावयास जाणाऱ्या मुंबईकरांनी सावध राहावे, असे आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे. २४ जून रोजी ४.८९ मीटर, २५ जून रोजी ४.९७ मीटर, २६ जून रोजी ४.९३ मीटर, २७ जून रोजी ४.७९ मीटर, तर २८ जून रोजी ४.५४ मीटर उंचीच्या लाटा मुंबईच्या किनाऱ्यावर धडकण्याची शक्यता आहे.