मुंबईमध्ये पुन्हा एकदा पोस्टरबाजीला ऊत आला असून त्यास आळा घालण्यासाठी पालिकेने महिनाभरात पुन्हा एकदा धडक कारवाई हाती घेतली होती. या मोहिमेअंतर्गत मुंबईतील तब्बल ३,६२८ बॅनर्स, फलक आणि भित्तीपत्रके जप्त करण्यात आली. यामध्ये ४६२ राजकीय बॅनर्स, फलक, पोस्टर्स आणि राजकीय पक्षांच्या झेंडय़ांचा समावेश आहे. मात्र, ही अनधिकृत फलकबाजी करून मुंबई विद्रुप करणाऱ्यांवर पालिकेने कसलीही कारवाई केलेली नाही.
दहीहंडी उत्सव, गणेशोत्सवादरम्यान आणि विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर मुंबईमध्ये मोठय़ा प्रमाणावर फलक झळकविण्यात आले होते. त्यामुळे पुन्हा एकदा मुंबईच्या विद्रुपीकरणास सुरुवात झाली होती. त्यामुळे पालिकेने १ सप्टेंबर रोजी ‘बॅनर्स हटाव’ मोहीम हाती घेतली होती. १ ते ३१ सप्टेंबर या काळात पालिकेने मुंबईतील ३,६२८ फलक-भित्तीपत्रके जप्त केली. यामध्ये १३४५ धार्मिक, ४६२ राजकीय, १०७ व्यावसायिक फलकांचा समावेश होता. १११ राजकीय, १ व्यावसायिक तर ४०५ धार्मिक फलक जप्त करण्यात आले आहेत. ५१२ धार्मिक आणि २१ व्यावसायिक पोस्टर्स ताब्यात घेण्यात आली आहेत. तसेच मुंबईत ठिकठिकाणी फडकविण्यात आलेले विविध पक्षांचे तब्बल ६८३ झेंडेही पालिकेने काढून टाकले आहेत.
अनधिकृतपणे झळकविण्यात आलेले फलक, पोस्टर्स हटवून मुंबई स्वच्छ करण्याचा प्रयत्न पालिकेने गेल्या महिनाभरात केला आहे. मात्र या अनधिकृत फलकबाजीविरोधात पालिकेने पोलीस ठाण्यात एकही तक्रार नोंदविलेली नाही.