पर्यटकांच्या प्रतिसादामुळे राणीच्या बागेतील कक्ष उभारणीचा २५ टक्के खर्च वसूल

मुंबई : भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालयात हम्बोल्ट पेंग्विनच्या दर्शनासाठी येणाऱ्या पर्यटकांचा ओघ वाढला आहे. रोज सुमारे १० हजार, तर सुट्टीच्या दिवशी २० हजार पर्यटक हजेरी लावत आहेत. पेंग्विन कक्षासाठी पालिकेने केलेल्या खर्चापैकी २५ टक्के रक्कम वसूल झाली आहे.

भारतातील जुन्या प्राणिसंग्रहालयापैकी एक असलेली राणीची बाग १८६२ मध्ये उभारण्यात आली. सुमारे ५३ एकर भूखंडावर उभारलेल्या या बागेतील प्राणिसंग्रहालयात देश-विदेशांतील प्राणी, पक्षी, जलचर, उभयचरांचा समावेश आहे. राणीच्या बागेच्या नूतनीकरणाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प पालिकेने हाती घेतला असून त्यामुळे भविष्यात मुंबईकरांना विदेशातील आणखी काही प्राणी, पक्ष्यांचे दर्शन घडणार आहे. याच प्रकल्पाचा एक भाग असलेले हम्बोल्ट पेंग्विन मार्च २०१७ मध्ये राणीच्या बागेत दाखल झाले. त्यामुळे पर्यटकांची गर्दी वाढली. नाताळच्या सुट्टीत ३० हजार पर्यटकांनी राणीच्या बागेला भेट दिल्याची माहिती सहआयुक्त (सामान्य प्रशासन) सुधीर नाईक यांनी दिली.

राणीच्या बागेला भेट देणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत झालेली वाढ आणि सुधारित प्रवेश शुल्क यामुळे राणीच्या बागेच्या महसुलात लक्षणीय वाढ झाली आहे. एप्रिल २०१७ ते मार्च २०१८ या काळात पालिकेला प्रवेश शुल्काच्या रूपात सुमारे आठ कोटी रुपये उत्पन्न मिळाले आहे. तर चालू आर्थिक वर्षांतील १० महिन्यांमध्ये सुमारे सात कोटी रुपये पालिकेच्या तिजोरीत जमा झाले आहेत. राणीच्या बागेत हम्बोल्ट पेंग्विन दाखल झाल्यापासून आजपर्यंत तब्बल १५ कोटी रुपयांचा महसूल पालिकेला मिळाला आहे. राणीच्या बागेत हम्बोल्ट पेंग्विन दाखल होण्यापूर्वी पालिकेला वर्षांकाठी ४० ते ५० लाख रुपये उत्पन्न मिळत होते. हम्बोल्ट पेंग्विनसाठी कक्षाची उभारणी आणि साजेसा परिसर यासाठी ४५ कोटी रुपये खर्च करण्यात आला. देखभालीवर वर्षांकाठी सुमारे साडेतीन कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. राणीच्या बागेतील प्रवेश शुल्कामुळे खर्चापैकी २५ टक्के रक्कम दोन वर्षांमध्येच वसूल झाला आहे.

सुधारित प्रवेशशुल्क

हम्बोल्ट पेंग्विन कक्षाच्या उभारणीनंतर परिरक्षण आणि उद्यानाचे आधुनिकीकरण यासाठी सुधारित प्रवेशशुल्क लागू करण्यात आले. त्यानुसार तीन वर्षांपर्यंतच्या मुलांना मोफत, १२ वर्षांपर्यंतच्या मुलांना प्रत्येकी २५ रुपये, प्रौढांसाठी प्रत्येकी ५० रुपये शुल्क निश्चित करण्यात आले. कौटुंबिक सहलींसाठी सवलत म्हणून एकत्रित १०० रुपये तिकिटाची सुविधा उपलब्ध करण्यात आली. यामध्ये आई-वडिलांसह येणाऱ्या तीन ते १२ वर्षांपर्यंतच्या दोन मुलांना प्रवेश देण्यात येतो. शाळेतर्फे राणीच्या बागेत आयोजित करण्यात येणाऱ्या सहलीसाठी प्रति विद्यार्थी १५ रुपये शुल्क आकारण्यात येत आहे, तर पालिका शाळांच्या सहलींना मोफत प्रवेश देण्यात येत आहे, असेही सुधीर नाईक यांनी सांगितले.