अडीच हजार कोटींच्या खर्चाला कात्री

मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या सन २०२०-२१ च्या अर्थसंकल्पाला पालिका महासभेत गुरुवारी मंजुरी देण्यात आली. ३३ हजार ४४१ कोटींचा अर्थसंकल्प मंजूर करण्यात आला. त्यात अडीच हजार कोटींच्या खर्चाला कात्री लावण्यात आल्याचे समजते.

टाळेबंदीपूर्वी पालिकेच्या अर्थसंकल्पाच्या उत्पन्नाच्या बाजूला मंजुरी देण्यात आली होती. मात्र टाळेबंदीमुळे गेल्या पाच महिन्यांत सभा होऊ न शकल्यामुळे अर्थसंकल्प मंजूर होऊ शकला नाही. त्यातच करोनामुळे पालिकेचा खर्च प्रचंड वाढल्यामुळे तब्बल अडीच हजार कोटींच्या खर्चात कपात करण्यात आली आहे.

कपात अशी..

’ पालिकेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या कोस्टल रोडसाठी दोन हजार कोटींची तरतूद करण्यात आली होती. मात्र आता त्यात ५०० कोटींची कपात करण्यात आली आहे. बेस्टला देण्यात येणाऱ्या अनुदानातही ५०० कोटींची कपात केली आहे.

’ अर्थसंकल्पात विकासकामासाठी १४ हजार ६४७ कोटी ७६ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली होती. मात्र टाळेबंदीमुळे पालिकेच्या अपेक्षित उत्पन्नात चार हजार कोटी रुपयांची तूट झाली होती. त्यामुळे महासभेत गुरुवारी अर्थसंकल्प मंजूर करताना अडीच हजार कोटींची कपात करण्यात आली आहे. रस्ते विभागातील तरतुदीही ४४ कोटींनी कमी केल्या आहेत.