‘प्रभाग’फेरी – ‘एस’ विभाग – भाग १

अंतर्गत भाग :  विक्रोळी, कन्नमवार नगर, टागोर नगर

कोणे एकेकाळी हा परिसर निर्जन होता. कोकणवासीय कामधंद्याच्या निमित्ताने मुंबईत आले आणि हळूहळू ते भांडुप आणि आसपासच्या परिसरात विसावू लागले. कालौघात मोठय़ा प्रमाणावर लोकवस्त्या उभ्या राहिल्या. बैठय़ा घरांसोबतच छोटय़ा छोटय़ा टेकडय़ांवर झोपडपट्टय़ा दिसू लागल्या आणि हा परिसर गजबजून गेला. म्हाडाने १९६७-६८ मध्ये विक्रोळीतील कन्नमवार नगर व टागोर नगरात इमारती बांधल्या आणि बहुसंख्य कुटुंबे या इमारतींच्या आश्रयाला आली. मुंबईतील म्हाडाच्या ५७ वसाहतींपैकी ही सर्वात मोठी वसाहत म्हणून ओळखली जाते. पवई परिसरात अनेक उत्तुंग इमारती उभ्या राहिल्या आहेत. उच्चभ्रू, मध्यमवर्गीय आणि झोपडपट्टीवासीय असा संमिश्र लोकवस्ती असलेला हा परिसर. पूर्व उपनगरवासीयांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा लालाबहाद्दूर शास्त्री मार्ग (एलबीएस रोड) याच परिसरातून पुढे जातो. भांडुप जलशुद्धीकरण संकुल हा पालिकेचा मोठा प्रकल्प याच भागात आहे. तलावातून येणारे अशुद्ध पाणी तिथे शुद्ध केले जाते आणि पुढे ते विविध भागांत जलवाहिन्यांच्या माध्यमातून पोहोचविले जाते. त्याशिवाय पवई, विहार तलाव आणि पवई तलावाजवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर ‘थीम पार्क’ यासह आसपास बहरलेली उद्याने केवळ स्थानिक रहिवाशीच नव्हे तर देशी-विदेशी पर्यटकांची आकर्षणस्थाने बनली आहेत.

मिठी नदीचा उगम विहार तलावाजवळून होतो. भांडुपमधील मधुबन गार्डन, शिवाजी तलाव, कांजूरमधील शहीद जयवंत पाटील उद्यान अशी काही ठरावीक विरंगुळ्याची ठिकाणे या परिसरात आहेत. ‘एस’ विभाग कार्यालयाच्या हद्दीतील परिसर आता वेगाने कात टाकू लागला आहे. चाळींची जागा टॉवर घेऊ लागले आहेत. त्यामुळे भविष्यात या परिसराचे चित्र बदललेले असेल.

प्रभागांच्या समस्या

पाण्यावरून ‘चकमक’

कन्नमवार नगर, टागोर नगरमध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने वरच्या मजल्यांवरील रहिवाशांना पाणीप्रश्न भेडसावत आहे. अनेक रहिवाशांवर पाण्यासाठी पंप बसविण्याची वेळ आली आहे. पंप बसविल्यानंतर शेजारील रहिवाशांना पाणीसमस्या भेडसावत आहे. परिणामी, अधूनमधून रहिवाशांमध्ये शाब्दिक चकमकी झडण्याचे प्रसंग घडू लागले आहेत.

बेकायदा बांधकामांचे पेव, अस्ताव्यस्त वाहने

कन्नमवार नगर आणि टागोर नगरमधील इमारती गेल्या काही वर्षांत देखभालीअभावी जर्जर होऊ लागल्या आहेत. म्हाडाच्या काही इमारती पुनर्विकासाच्या नावाखाली रिकाम्या करण्यात आल्या; परंतु अद्याप येथे नव्या इमारती उभ्या राहू शकलेल्या नाहीत. रहिवाशांना मात्र भाडय़ाच्या घराचा आसरा घ्यावा लागलेला आहे. या प्रश्नासाठी रहिवाशांनी अनेक वेळा आंदोलने केली. म्हाडाने धोरण न आखल्यामुळे या इमारतींच्या पुनर्विकासाच्या प्रश्नाचे घोंगडे भिजतच पडले आहे. या भागात मंडई नाही. वाहनतळाची व्यवस्था नसल्याने रस्त्यावर वाहने अस्ताव्यस्तपणे उभी असतात. मोठय़ा प्रमाणावर अनधिकृत बांधकामे झाली असून त्याकडे पालिकेचे दुर्लक्ष झाले आहे. समाज कल्याण आणि कामगार कल्याण केंद्रात सामाजिकांऐवजी विवाह सोहळेच पार पडतात.

लोकसभा निवडणुकीत एकपक्षीय वर्चस्वाचा अभाव

मराठी, गुजराती, मुस्लीम असा मिश्र वस्तीचा हा परिसर आहे. सुरुवातीच्या काळात यापैकी बहुतांश परिसरांत काँग्रेसचे प्राबल्य होते. कामगार नेते दिना बामा पाटील यांना मानणारा एक मोठा वर्ग या परिसरात होता. कडवा शिवसैनिक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खिम बहाद्दूर थापा यांनी या परिसरात शिवसेनेची बांधणी केली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या भाषणांमुळे आकर्षित झालेल्या या परिसरातील अनेकांनी शिवसेनेला आपलेसे केले आणि या भागात शिवसेनेचा जोर वाढत गेला. लोकसभा निवडणुकीत मात्र या भागात शिवसेनेला यश मिळू शकलेले नाही. लोकसभा निवडणुकीत कोणत्याही एका पक्षाला या भागात आपले वर्चस्व निर्माण करता आले नाही. लोकसभेच्या सलग तीन निवडणुकांमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजपच्या उमेदवारांच्या झोळीत मते टाकून मतदारांनी त्यांना लोकसभेत पाठविले. निवडून आल्यानंतर लोकप्रतिनिधींना या भागात बांधणी करता आली नाही. काही अपवाद वगळता अन्य भागांत विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचा भगवा फडकत राहिला.

तर पालिका निवडणुकीच्या रिंगणात या भागातून विजयश्री मिळवून शिवसेनेचे अनेक उमेदवार पालिकेत गेले. दत्ता दळवी हे महापौर झाले; पण मनसेच्या निर्मितीनंतर या भागात शिवसेनेला खिंडार पडले. या भागातून मनसेचे आमदार, नगरसेवक निवडून आले, पण आता परिस्थिती बदलू लागली आहे.

सध्याचे नगरसेवक

*  प्रभाग – ११२

नगरसेवक -प्रियांका शृंगारे,  मनसे

*  प्रभाग – ११३

नगरसेवक –  तावजी गोरुले, शिवसेना

*  प्रभाग – ११४

नगरसेवक –  विश्वास शिंदे, शिवसेना

फेररचनेनंतरची प्रभाग रचना 

*  प्रभाग ११८

आरक्षण –  खुला

लोकसंख्या –  ५५,९६६

प्रभाग क्षेत्र  –  कन्नमवार नगर १ आणि २, टागोर नगर, हनुमान नगर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, अस्मिता कॉलेज कला आणि वाणिज्य महाविद्यालय

 

* प्रभाग ११९

आरक्षण –  नागरिकांचा मागासवर्ग (महिला)

लोकसंख्या –  ५९,०३१3

प्रभाग क्षेत्र  –  भारत नगर, राजीव गांधी नगर, विक्रोळी विद्यालय, अशोक नगर, जय भवानी चाळ, काळाघोडा रामवाडी

*  प्रभाग १२०

आरक्षण –  सर्वसाधारण महिला

लोकसंख्या –  ५५,०८४

प्रभाग क्षेत्र  –  सूर्या नगर, चंदन नगर, गोदरेज हिल साइट कॉलनी, लोकमान्य नगर, सिप्ला कंपनी

मुंबईमधील म्हाडाची सर्वात मोठी वसाहत कन्नमवार नगर आणि टागोरनगरमध्ये उभी आहे. पण येथे मूलभूत सेवा-सुविधाच नाहीत. चांगले मार्केट, अभ्यासिका, वाहनतळ, स्मशानभूमी आदी विविध सुविधांची येथे गरज आहे. मलनिस्सारण वाहिन्यांचे जाळे सक्षम नसल्यामुळे गटारे, शौचालये तुंबण्याचे प्रकार वारंवार या भागात घडतात.

– सुरेश सरनोबत, समाजसेवक

कांजूर कचराभूमी येथून दूर असली तरी कचऱ्याची दरुगधी या परिसरातही सहन करावी लागते. या भागात कचरापेटी कायम कचऱ्याने ओसंडून वाहते. नियमितपणे कचरा उचलून नेण्यात येत नसल्याने कचराकुंडी भरल्यानंतर कचरा रस्त्यावर पडतो. त्यामुळे घुशीचा प्रादुर्भाव वाढत आहे. नवी जलवाहिनी टाकल्यामुळे या एका समस्येतून रहिवाशांची सुटका झाली आहे.

-रंजना दिलीप कुडतरकर, गृहिणी, कन्नमवार नगर

म्हाडाच्या इमारतींचा पुनर्विकास रखडला असून या इमारतींच्या पुनर्विकासासाठी धोरण आखण्याची गरज आहे. मात्र अद्याप धोरणाला अंतिम रुप मिळत नसल्याने मोठय़ा घराचे स्वप्न साकारू शकलेले नाही. येथे डासांचा प्रादुर्भाव झाला आहे. धूरफवारणीचा परिणाम डासांवर होत नाही.

– प्रमोद सावंत, रहिवाशी, टागोरनगर