मुंबई उपनगरात विद्युतपुरवठा करणाऱ्या बीएसईएसला पालिकेने अत्यल्पदरात दिलेले भूखंड सरकारने रिलायन्स वीज कंपनीला बाजारभावात विकल्याचा आरोप शिवसेनेकडून करण्यात आला आहे. या व्यवहारात मोठा घोटाळा झाला असून त्याची चौकशी करण्याची मागणीही करण्यात आली आहे.
बीएसईएस कंपनीला वीज उपकेंद्र उभारण्यासाठी भूखंडांची आवश्यकता होती. त्यासाठी राज्य सरकारने महापालिकेकडून सवलतीच्या दरात भूखंड घेतले आणि ते बीएसईएस कंपनीला दिले. मात्र, बीएसईएस कंपनी रिलायन्स वीज कंपनीने घेतली आणि उपनगरांमधील विद्युतपुरवठय़ाची जबाबदारी नव्या कंपनीवर टाकण्यात आली. बीएसईएस कंपनीला अल्पदरात उपलब्ध केलेले पालिकेचे सुमारे १०० भूखंड राज्य सरकारने रिलायन्सला बाजारभावाने विकले. या व्यवहारातील किती पैसे पालिकेच्या तिजोरीत जमा झाले, सरकारने किती आणि कोणते भूखंड रिलायन्सला विकले याची माहिती द्यावी, असा मुद्दा उपस्थित करुन शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक सुरेंद्र बागलकर यांनी सुधार समितीच्या बुधवारच्या बैठकीत राज्य सरकारवर टीकास्र सोडले.