पालिका आयुक्तांनी दोन वेळा तंबी देऊनही अधिकाऱ्यांनी आपल्या ‘सेवेसी’ ठेवलेल्या सफाई कामगारांची मूळ कामासाठी रवानगी केलेली नाही. प्रशासकीय कर्मचाऱ्यांचे सर्व फायदे ही कामगार मंडळी लाटत आहेत. कार्यालयांमध्ये ‘विश्रांतीपूर्ण’ काम करणाऱ्या या कामगारांबद्दल सफाई खात्यात प्रचंड असूया निर्माण झाली असून ‘आपल्यालाही घाणीत काम करायचे नाही’ असे म्हणत सफाई कामगार बंडाचा झेंडा फडकविण्याच्या तयारीत आहेत.
सफाई, पाणीपुरवठा, रस्ते, परिरक्षण आदी विविध विभागांमध्ये भरती करण्यात आलेल्या २२ हजार कामगारांपैकी १२०० हून अधिक कामगार पालिकेच्या २४ विभाग कार्यालयांमधील विविध विभागांमध्ये ‘विश्रांतीपूर्ण’ काम करीत आहेत. अधिकारी आणि राजकारण्यांनी असंख्य लोकांना सफाई कामगार भरतीच्या माध्यमातून पालिकेत नोकरी मिळवून दिली आहे. अशा, मर्जीतील सफाई कामगाराला घाणीत काम करावे लागू नये, यासाठी अधिकारी-राजकारणी विविध खात्यातील शिपाई अथवा तत्सम पदावर कर्मचाऱ्याची आवश्यकता भासवून तेथे त्यांची वर्णी लावून घेत आहेत. त्यामुळे सफाई कामगारांची कमतरता भासू लागली आहे. हा प्रकार महापालिकेला गेल्या २० वर्षांहून अधिक काळ डोकेदुखी ठरला आहे.
अधिकारी आणि राजकारण्यांची ही चालबाजी लक्षात आल्यामुळे १९९५ मध्ये पालिका आयुक्तांनी परिपत्रक काढून अशा सफाई कामगारांना तात्काळ मूळ काम करण्यासाठी पाठविण्याचे आदेश दिले होते. मात्र परिस्थिती ‘जैसे थे’ राहिली. पालिका आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर जयराज फाटक यांनीही या प्रकाराला आळा घालण्याचा प्रयत्न केला. २९ नोव्हेंबर २००८ रोजी परिपत्रक काढून या कामगारांची मूळ कामाच्या ठिकाणी पाठवणी करण्याचे आदेश त्यांनी सर्व अधिकाऱ्यांना दिले. इतकेच नव्हे तर आदेशांचे उल्लंघन करणाऱ्या अधिकाऱ्याविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्याची तंबीही दिली. मात्र आयुक्तांचे आदेश धाब्यावर बसवून या अधिकाऱ्यांनी आपल्या मर्जीतील सफाई कामगारांना कार्यालयातच बसवून ठेवले आहे. आता हे कामगार कार्यालयातच रमले असून मूळ कामासाठी जाण्याची त्यांची तयारी नाही. कामगार संघटनांनीही याबाबत मौन धरले आहे. मात्र सापत्न वागणूक मिळत असल्याची भावना घाणीने हात बरबटणाऱ्या सफाई कामगारांची झाली आहे. त्यामुळे ते बंडाच्या पवित्र्यात आहेत.