वांद्रे-कुर्ला संकुलातील सफाईचे अडीच कोटी थकवूनदेखील स्वच्छता सुरूच

यांत्रिक झाडूने वांद्रे-कुर्ला संकुलामधील रस्त्यांची साफसफाई करणाऱ्या पालिकेचे एमएमआरडीएने तब्बल २.७७ कोटी रुपये थकविले आहेत. असे असतानाही आजही पालिकेकडून संकुलात साफसफाई केली जात आहे. एमएमआरडीएचे अध्यक्ष असलेल्या मुख्यमंत्र्यांनीच पालिकेची थकबाकी लवकर मिळावी यासाठी लक्ष घालावे, अशी मागणी पालिका वर्तुळातून होऊ लागली आहे.

बडय़ा कंपन्या, बँका, सरकारी कार्यालये असलेल्या वांद्रे-कुर्ला संकुलात स्वच्छता राहावी यासाठी पालिकेने तेथे यांत्रिक झाडूच्या माध्यमातून साफसफाई करण्याचा निर्णय घेतला होता. त्याप्रमाणे पाच वर्षे हे काम करण्यासाठी कंत्राटदाराची नियुक्ती केली आणि २५ मे २०१४ पासून यांत्रिक झाडूच्या माध्यमातून साफसफाईला सुरुवात झाली. पहिल्या वर्षी २९००७ रुपये प्रतिदिन दराने, तर त्या पुढील वर्षी अधिक पाच टक्के दराने हे काम देण्यात आले. आतापर्यंत ८९१ दिवसांचे २ कोटी ७६ लाख ७३ हजार रुपये झाले असून ही रक्कम एमएमआरडीएने पालिकेला देणे अपेक्षित आहे. मात्र यापैकी एक छदामही एमएमआरडीएने पालिकेला दिलेला नाही. माहितीचा अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी माहितीच्या अधिकारात मागितलेल्या माहितीनुसार हा प्रकार उघडकीस आला आहे. थकबाकीची रक्कम भरावी यासाठी पालिकेने एमएमआरडीएला चार वेळा पत्रव्यवहार केला आहे. परंतु या पत्रांचे साधे उत्तरही एमएमआरडीएकडून पालिकेला देण्यात आलेले नाही. त्यामुळे या प्रकरणात आता मुख्यमंत्र्यांनीच लक्ष घालावे आणि पालिकेचे पैसे मिळवून द्यावेत, अशी मागणी पालिका वर्तुळातून करण्यात येत आहे.