• पालिका शाळांत सूर्यनमस्काराची सक्ती
  • भाजपच्या आठ नगरसेवकांचे मौनाचे योग

महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना सूर्यनमस्कार व योगाच्या सक्तीसाठी हिरिरीने पुढाकार घेणाऱ्या भाजपच्या आठ नगरसेवकांपैकी तीन नगरसेवकांनी गेल्या पाच वर्षांत पालिका शाळांमधील विद्यार्थ्यांची गळती, घसरणारी पटसंख्या, शिक्षणाचा दर्जा, मोडकळीस आलेल्या शाळांच्या इमारती आदी शिक्षणाशी थेट संबंध असलेल्या असंख्य प्रश्नांबाबत एक चकारही पालिका सभागृहात काढलेला नाही. उर्वरित पाचपैकी दोघे नगरसेवक शिक्षण समितीचे अध्यक्ष राहिलेले आहेत, तर आणखी तिघांना मिळून पालिका शाळेतील शिक्षणाबाबत केवळ नऊच प्रश्न पडले होते. पालिकेच्या शाळांमधील शिक्षणाची स्थिती दिवसेंदिवस दयनीय होत असून विद्यार्थी गळतीचे प्रमाण तब्बल १५ टक्क्यांवर पोहोचले आहे. पण, यावर चर्चा करून मार्ग काढण्यापेक्षा नगरसेवकांना सूर्यनमस्कार व योग जास्त महत्त्वाचे वाटतात.

पालिकेने २०१६-१७मध्ये २,३९४ कोटी रुपये शिक्षणासाठी राखून ठेवले आहे. (यात प्राथमिक शाळांना दिल्या जाणाऱ्या अनुदानाचा समावेश नाही.) मात्र यातील बहुतांश खर्च हा शाळांच्या इमारतींचे बांधकाम व दुरुस्तीवर खर्च होतो. पालिका शाळांमध्ये व्हच्र्युअल क्लासरूम व टॅबचा प्रकल्प राबवण्यात आला असला तरी त्यामुळे शिक्षणाचा दर्जा वधारल्याचे उदाहरण नाही. शिक्षणाचा यथातथा दर्जा, सुविधांची वानवा यामुळे गरीब पालकही पदरमोड करून मुलांना खासगी शाळेत धाडतात. मध्यान्ह भोजनाच्या बाबतही पालिका शाळांची स्थिती दखल घेण्यासारखी नाही. खिचडीबाबत तर अनेक तक्रारी आहेत. परंतु, दुदैवाने या प्रश्नांकरिता भाजपच्या नगरसेवकांनी सूर्यनमस्कार किंवा योगाप्रमाणे हिरिरीने पुढाकार घेतल्याचा इतिहास नाही.मंगळवारी भाजपच्या समिता कांबळे यांनी सूर्यनमस्काराचा प्रस्ताव मांडला तेव्हा त्याला भाजपच्या इतर सात नगरसेवकांनी पाठिंबा दिला. याला १४ नगरसेवकांनी विरोध केला तर शिवसेनेने मिठाची गुळणी धरली. मात्र सेना-भाजप युतीच्या संख्याबळावर भाजपने हा प्रस्ताव संमत करून घेतला. या चर्चेत सहभागी झालेले भाजपच्या दोन नगरसेवकांपैकी विनोद शेलार व रितू तावडे शिक्षण समितीचे अध्यक्षही राहिले आहेत. मात्र या दोघांच्याही कार्यकाळात पालिकेच्या शाळांची स्थिती सुधारण्यासाठी विशेष प्रयत्न झालेले नाहीत.

पालिका शाळांमधून विद्यार्थ्यांची गळती वाढत चालली आहे. गरीब पालकही मुलांना पालिका शाळांमधून काढून दुसरीकडे टाकतात. पहिलीत प्रवेश घेणाऱ्यांचीही संख्याही कमी झाली आहे. हे सर्व पालिकेची शिक्षणव्यवस्था खालावल्याची लक्षणे आहेत. प्रत्येक विद्यार्थ्यांमागे ५७ हजार रुपये खर्च होत असूनही हा पैसा करदात्याच्या खिशातून जात आहे. मात्र शिक्षण व्यवस्था सुधारण्यासाठी प्रयत्न करण्याऐवजी नगरसेवक वेगळ्याच बाबींकडे लक्ष देत आहेत, असे प्रजा फाऊंडेशनचे मिलिंद म्हस्के म्हणाले.

३.९०  लाख पालिका शाळेतील विद्यार्थी संख्या ६० हजार रुपये दर मुलामागे

पहिलीचे प्रवेशही घटले

२०१४-१५ या शैक्षणिक वर्षांत केवळ ३९ हजार विद्यार्थ्यांनी पहिलीत प्रवेश घेतला. २००९-१० मध्ये ही संख्या तब्बल ६७ हजार होती. सांख्यिकीनुसार विचार करता २०१८-१९ मध्ये विद्यार्थ्यांची संख्या ३१ हजारावर येण्याचा अंदाज प्रजा फाऊंडेशनच्या अहवालात मांडण्यात आला आहे. पालिका शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या गेल्या दहा वर्षांत सातत्याने कमी होत आहे. २०१०-११मध्ये विद्यार्थ्यांची संख्या ४ लाख ३८ हजार होती. २०१४-१५ या वर्षांत ती ३ लाख ९७ हजारांवर आली. मराठी शाळेतील मुलांची संख्या १ लाख २५ हजारावरून केवळ ७४ हजारांवर आली आहे. २०१४-१५ मध्ये हिंदी शाळांमध्ये १ लाख १६ हजार तर उर्दू शाळांमध्ये १ लाख ७ हजार विद्यार्थी शिक्षण घेत होते. गुजरातीमधून ५२९९, कन्नडमधून २५४९, तामिळमधून ६०६५ तर तेलुगूमधून २०६२ विद्यार्थी शिकत होते.

गुणवत्तेचा सूर्य कधी उगवणार?

२०१४-१५ मध्ये पालिकेतर शाळांमध्ये दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या ८५ टक्के होती तर पालिकेचे केवळ ७२ टक्केच विद्यार्थी दहावी उत्तीर्ण होऊ शकले. चौथीच्या शिष्यवृत्ती परीक्षेतही खासगी शाळांमध्ये ९.८ टक्के विद्यार्थ्यांना यश मिळाले असताना पालिकेच्या शाळांमध्ये हे प्रमाण अवघे १.८ टक्के होते. तर सातवीच्या शिष्यवृत्तीत हे प्रमाण अनुक्रमे ८ टक्के आणि ०.३ टक्के इतके होते.

विद्यार्थ्यांची गळती १३ टक्के

गेल्या पाच वर्षांत पालिका शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांमधील गळतीचे प्रमाण चार टक्क्यांवरून १३ टक्के इतके वाढले आहे. २०१४-१५ या वर्षांत मराठी शाळांमध्ये दहा टक्के, हिंदीमध्ये १८ टक्के, उर्दूमध्ये १४ टक्के तर इंग्रजीमध्ये ५ टक्के विद्यार्थी गळले.

सूर्यनमस्काराच्या बाजूने बोलणारे नगरसेवक आणि त्यांनी शिक्षणाबाबत उपस्थित केलेले प्रश्न (सर्व भाजपचे).

मी आमच्या वॉर्डातील पालिकेच्या दोन शाळांची डागडुजी केली आहे. हनुमानपाडा शाळेची डागडुजी झाली असून यापुढे गुरुगोविंद शाळेच्या डागडुजीचे काम सुरू होईल.

– समिता कांबळे, मुलुंड (विचारलेले प्रश्न – ०)

आमच्या भागात शिक्षणमंत्री विनोद तावडेंनी खूप काम केले आहे. त्यामुळे आम्हाला वेगळे काम करण्याची गरज नाही. माझ्या वॉर्डात पालिकेच्या चार शाळा आहेत आणि चारही शाळांची परिस्थिती अतिशय चांगली आहे.

– बिना दोशी, चारकोप (विचारलेले प्रश्न – २)

माझ्या वॉर्डमध्ये टाटा कम्पाऊंड आणि गांधीग्राम या पालिकेच्या दोन शाळा आहेत. या शाळांच्या इमारतीच्या डागडुजीचे प्रश्न उपस्थित केले होते. तर पालिकेच्या शाळांमध्ये इंग्रजीच्या शिक्षणाचा दर्जा वाढावा यासाठी प्रयत्न केले. शालेय मुलांचा सकस आहार, शालेय वस्तू मिळाव्यात याबाबतचे प्रश्न पालिकेसमोर उपस्थित केले होते.

– दिलीप पटेल, गोरेगाव (विचारलेले प्रश्न – ६)

मी गेल्या चार वर्षांत शिक्षणाबाबतचे अनेक प्रश्न विचारले आहे. यामध्ये लहान मुलांचे आरोग्य, मुलांना मिळणारे दुपारचे अन्न, शाळेतील गरजेच्या वस्तू, गणवेश, पुस्तके असे अनेक प्रश्न सोडविण्यात आले आहे.

– ज्योती अळवणी, विलेपार्ले (विचारलेले प्रश्न- ०)

माझ्या वॉर्डमध्ये पालिकेची एकही शाळा नसल्यामुळे शिक्षणाबद्दलचा प्रश्न उपस्थित केला नाही. तर दुसऱ्या नगरसेवकांच्या वॉर्डात काम करणे मला योग्य वाटले नाही.

– ज्ञानमूर्ती शर्मा (विचारलेले प्रश्न – १)

माझ्या वॉर्डात पालिकेची पहिली ते चौथीपर्यंतची एकच शाळा आहे. ही शाळा भाडय़ाची असल्यामुळे काम करण्यासाठी मर्यादा येतात. तरी मुलांचा वस्तू वाटप, इमारतीची रंगरंगोटी करणे, शौचालयाचे अनेक प्रश्न उपस्थित केले होते आणि या समस्या सोडविण्यात मला यश आले आहे.

– कृष्णा पारकर, खार (विचारलेले प्रश्न- ०)

school-chart