धोरणात तरतूद नसल्यामुळे नगरसेवकाची मागणी फेटाळली

पालिका शाळांना नाव देण्यासाठी धोरण निश्चित करण्यात आले असून या धोरणात तरतूद नसल्याने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव विक्रोळी पार्क साईट येथील ९० फूट रस्त्यावर उभारण्यात आलेल्या पालिका शाळेला नाव देता येणार नाही असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. या प्रकरणी पालिका सभागृहात मुद्दा उपस्थित करण्याचा निर्णय संबंधित नगरसेवकाने घेतला आहे.

विक्रोळी, पार्क साईट परिसरातील वर्षां नगर झोपडपट्टीमध्ये पालिकेने बैठी प्राथमिक शाळा सुरू केली होती. वर्षां नगर पार्क साईट शाळा या नावाने ही शाळा ओळखली जात होती. काही वर्षांपूर्वी पालिकेने पार्क साईट येथील ९० फूट रस्त्यांवरील मोकळ्या भूखंडावर भव्य इमारत बांधून वर्षां नगर पार्क साईट शाळा तेथे स्थलांतरित केली. पार्क साइट येथील ९० फूट रस्त्यावरील शाळा संकुलाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव द्यावे, अशी मागणी करणारे पत्र पालिकेच्या ‘एन’ प्रभाग समितीच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती असताना शिवसेना नगरसेवक तुकाराम पाटील यांनी १८ एप्रिल २०१७ रोजी शिक्षण समिती अध्यक्षांना पाठवून केली होती.

शिक्षण समिती अध्यक्षांनी हे पत्र पालिका प्रशासनाकडे पाठवून दिले होते. पालिकेच्या शिक्षण विभागाच्या शाळांना नाव देण्याबाबतचे धोरण अस्तित्वात असून त्यास पालिका सभागृहाने मंजुरी दिली आहे. या धोरणानुसार पालिकेच्या अस्तित्वात असलेल्या शाळांचे पुनर्नामकरण करता येणार नाही. यामुळे वर्षां नगर येथील पालिका शाळा संकुलाचे ‘बाळासाहेब ठाकरे महानगरपालिका शाळा संकुल’ असे नामकरण करता येणार नाही, असे प्रशासनाने अभिप्रायात स्पष्ट म्हटले आहे.

मुंबईतील ९० टक्के पालिका शाळांना त्या ज्या भागात आहेत त्याचे अथवा मार्गाचे नाव देण्यात आले आहे. काही विशिष्ट शाळांना ऐतिहासिक नेत्यांची नावे देण्यात आली आहेत. विभाग अथवा रस्त्याच्या नावामुळे पालकांना आपल्या मुलांना शाळेत प्रवेश घेण्यासाठी, तसेच येण्या-जाण्यासाठी सोयीस्कर होते, तसेच शाळेच्या नावात बदल केल्यास माजी विद्यार्थ्यांना देण्यात येणऱ्या शाळा सोडल्याच्या दाखल्याबाबतही तांत्रिक समस्या निर्माण होऊ शकते, असा युक्तिवाद पालिका अधिकाऱ्यांनी शाळांच्या नामकरणाबाबत केला आहे.

मात्र शिवसेनाप्रमुखांचे नाव देण्यास प्रशासनाने नकार दिल्यामुळे हा प्रश्न पालिका सभागृहात मांडण्यात येईल. शाळांच्या नामकरणाबाबत पालिका सभागृह एकमताने निर्णय घेईल, असे तुकाराम पाटील यांनी सांगितले.