‘डी’ विभाग कार्यालयाच्या परिसरात ‘माझा कचरा, माझी जबाबदारी’ मोहीम

कचरा व्यवस्थापनाचे प्रयोग फारसे यशस्वी होत नसल्याने मुंबई महापालिकेला आता शहरातील शाळांना साद घालावी लागत आहे. विद्यार्थ्यांना शाळेतूनच स्वच्छतेचे धडे दिले जावे यासाठी पालिकेने ‘माझा कचरा, माझी जबाबदारी’ ही मोहीम सुरू केली आहे. पालिकेच्या ‘डी’ विभाग कार्यालयाच्या हद्दीत म्हणजेच गिरगाव, ग्रॅन्ट रोड, ताडदेव, मुंबई सेंट्रल आणि आसपासच्या भागांत ही मोहीम प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात येत आहे.

‘स्वच्छ भारत’ अभियानातील ‘स्वच्छते’च्या स्पर्धेत गेल्या वर्षी मुंबई मागे पडली आहे. स्वच्छतेतील मुंबईची पीछेहाट थांबावी यासाठी आता पालिकेने कंबर कसली आहे. मुंबईकरांकडून ‘स्वच्छता’ अ‍ॅपला मोठा प्रतिसाद मिळावा म्हणून पालिकेने मोहीम हाती घेतली असून मुंबईकरांशी संवाद साधण्यासाठी पालिकेने एका संस्थेची नियुक्ती केली आहे. याचाच आणखी एक भाग म्हणून शाळांमधून विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. त्यासोबतच आपले घर, शाळा, आसपासचा परिसर स्वच्छ कसा ठेवावा, याचे प्रशिक्षणही विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे. याकरिता पालिकेने शाळा व्यवस्थापनांशी संपर्क साधण्यास सुरुवात केली आहे.

पालिकेच्या ‘डी’ विभाग कार्यालयाच्या हद्दीत म्हणजेच गिरगाव, चर्नी रोड, ग्रॅन्ट रोड, ताडदेव, मुंबई सेंट्रल आणि आसपासच्या परिसरांतील शाळांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर ‘माझा कचरा, माझी जबाबदारी’ ही मोहीम राबविण्यात येणार आहे. या परिसरात तब्बल ४० शाळा असून या शाळाचे प्रमुख आणि मुख्याध्यापकांना ‘डी’ विभाग कार्यालयाकडून आवाहन पत्र पाठविण्यात आले आहे. घनकचरा व्यवस्थापन, कचऱ्याचे वर्गीकरण, स्वच्छता कशी राखावी याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. स्वच्छतेच्या संदर्भात काही योजना सुचविण्याचे आवाहनही पालिकेकडून शाळा प्रमुख आणि मुख्याध्यापकांना या पत्राच्या माध्यमातून करण्यात आले आहे.

स्वच्छतेच्या मोहिमेत विद्यार्थ्यांचा सहभाग महत्त्वाचा आहे. आजचे विद्यार्थी उद्याचे नागरिक आहेत. विद्यार्थ्यांना आतापासूनच स्वच्छतेची शिस्त लागल्यास अनेक सकारात्मक बदल घडू शकतात. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या माध्यमातून पालकांना स्वच्छतेचा मंत्र देण्याचा हा एक प्रयत्न आहे.

विश्वास मोटे, साहाय्यक आयुक्त, ‘डी’ विभाग कार्यालय