माटुंगा (पश्चिम) येथील वुलन गिरणी महापालिकेच्या शाळेत असलेल्या ‘ग्रंथाली’ या प्रकाशन संस्थेच्या कार्यालयास महापालिकेने बुधवारी टाळे ठोकले. प्रसारमाध्यमांत हे प्रकरण झळकल्यानंतर हे टाळे तूर्तास काढण्यात आले.
पाच दिवसांपूर्वी तसेच मंगळवारी संध्याकाळी ही जागा रिकामी करण्याबाबत ‘ग्रंथाली’ला पालिकेने नोटीस जारी केली होती. महापौर तसेच आयुक्तांकडून ‘ग्रंथाली’चे काम चांगले असल्याचे कौतुक केले जात असताना ही कारवाई केल्याबद्दल ‘ग्रंथाली’कडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.या जागेचे वीज देयक, दूरध्वनी देयक आमच्या नावावर आहे. पालिकेने दिलेली जागा ते आमच्याकडून परत घेऊ शकतात. पण मग एकीकडे आमचे कौतुक करायचे आणि दुसरीकडे नोटीस देऊन जागेला टाळे लावायचे हा कोणता न्याय आहे, असा सवाल या संदर्भात ‘ग्रंथाली’चे सुदेश हिंगलासपूरकर यांनी केला.

अफूची विक्री करणारा पोलिसांच्या जाळ्यात
ठाणे : मुंबई, ठाणे, नवी मुंबई तसेच रायगड परिसरात अफूची विक्री करणाऱ्या मोहमद रशीद मोहमद अकबर शेख (२०) याला ठाणे अंमली विरोधी पथकाने अटक केली आहे. त्याच्याकडे साडेचार लाख रुपये किंमतीचा अफू तर घरामध्ये ९५ लाख रुपये किंमतीची ब्राऊन शुगर सापडली आहे. पश्चिम बंगालमधील मालदा जिल्ह्य़ाचा रहिवाशी असलेला मोहमद हा तेथे भाडय़ाने जमीन घेऊन अफूची शेती करतो, असेही निष्पन्न झाले आहे.