करोनाच्या धोक्यामुळे पालिकेची मोहीम

मुंबई :  करोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये ज्येष्ठ नागरिकांचे प्रमाण अधिक असून ज्येष्ठ नागरिकांचे आरोग्य आणि वैद्यकीय दृष्टिकोनातून एक विशेष सर्वेक्षण हाती घेण्याचे आदेश पालिका आयुक्त प्रवीणसिंह परदेशी यांनी दिले आहेत. त्यानुसार ज्येष्ठ नागरिकांचा शोध घेण्यासाठी झोपडपट्टय़ांमध्ये सर्वेक्षण करण्यात येणार आहे.

मुंबईमधील करोनाबाधितांची संख्या वाढत असून आतापर्यंत १५० जण मृत्युमुखी पडले आहेत. मृत्यू झालेल्यांमध्ये ज्येष्ठ नागरिकांची संख्या मोठी आहे. ही बाब लक्षात घेत ज्येष्ठ नागरिकांचा शोध घेऊन त्यांच्यावर वेळीच उपचार करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. विशेष म्हणजे झोपडपट्टय़ांमध्ये वास्तव्यास असलेल्या ज्येष्ठ नागरिकांचा शोध घेण्यासाठी व्यापक प्रमाणावर मोहीम हाती घेण्यात येणार आहे. अनियंत्रित मधुमेह, अनियंत्रित रक्तदाब, श्वसनाचे आजार, मूत्रपिंड विकार, थॉयराइडचे आजार, अनियंत्रित दमा यांसारखा त्रास होत असलेल्या ज्येष्ठ नागरिकांची अधिक काळजी घेणे गरजेचे आहे. त्यामुळे ही मोहीम हाती घेण्यात येत आहे. मोहिमेदरम्यान ज्येष्ठ नागरिकांच्या नोंदी घेऊन त्यांच्यावर उपचार करण्यात येणार आहेत. करोनाबाबत कशी काळजी घ्यावी याबाबत ज्येष्ठ नागरिक आणि त्यांच्या निकटवर्तीयांना मार्गदर्शनही करण्यात येणार आहे. ज्येष्ठ नागरिकांमध्ये काही लक्षणे आढळल्यास त्यानुसार वैद्यकीय तपासणी व आवश्यक ते उपचारही करण्यात येणार आहेत.

आरोग्य स्वयंसेविका, आशा कार्यकर्त्यां आणि राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक यांचे पथक तयार करण्यात येणार असून हे पथक झोपडपट्टय़ांमध्ये ज्येष्ठ नागरिकांचा शोध घेणार आहेत. ज्येष्ठ नागरिकांना मधुमेह, रक्तदाब, श्वसनाशी संबंधित विकार, दमा, मूत्रपिंडविकार, कर्करोग आदी आजार असल्यास त्यांची स्वतंत्र नोंद घेतली जाणार आहे. तसेच आवश्यकतेनुसार त्यांना त्यांच्या घराजवळच्या पालिकेच्या दवाखान्यात औषधोपचारांसाठी पाठविण्यात येणार आहे. पालिकेच्या दवाखान्यात येणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांच्या शरीरातील प्राणवायूची पातळी ही ‘ऑक्सी मीटर’ यंत्राद्वारे मोजण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ही पातळी ९५ टक्क्यांपेक्षा कमी असल्यास त्यांना तात्काळ निकटच्या सर्वसाधारण रुग्णालयात आवश्यक त्या उपचारांसाठी पाठविण्यात येणार आहे.