ऐश्वर्या-अभिषेक, अजय-काजोल यांच्यासह आमीरला पालिकेचे साकडे

मुंबई : ‘पाणी बचत’, ‘स्वच्छता मोहिमे’प्रमाणेच ‘प्लास्टिक बंदी’बाबत समाजामध्ये जनजागृती करण्याचा निर्णय पालिकेने घेतला असून जनजागृतीच्या माध्यमातून प्लास्टिकमुळे पर्यावरणाला निर्माण होत असलेला धोका चित्रपटसृष्टीतील तारकांच्या माध्यमातून नागरिकांना पटवून देण्याचा पालिकेचा मानस आहे. चित्रपटसृष्टीतील आघाडीचे अभिनेते आणि अभिनेत्रींची ‘प्लास्टिक बंदी’च्या जनजागृतीसाठी ‘सदिच्छा दूत’ म्हणून नियुक्ती करण्याचा निर्णय पालिकेने घेतला असून गावखेडय़ातील ग्रामस्थांची तहान भागविण्यासाठी सध्या झटणारा अभिनेता आमीर खान, अभिषेक – ऐश्वर्या बच्चन आणि अजय- काजोल देवगण यांनी ‘सदिच्छा दूता’ची जबाबदारी स्वीकारावी असे गाऱ्हाणे पालिकेने त्यांना पत्र पाठवून केले आहे.

मुंबईमध्ये अपुरा पाऊस पडल्यामुळे २००९ मध्ये मुंबईकरांना पाणी कपातीचा सामना करावा लागला होता. त्या वेळी पाण्यासाठी मुंबईमध्ये मोठय़ा प्रमाणावर आंदोलनेही करण्यात आली होती. तलावातील पाण्याचा साठा आटल्यामुळे पालिकेने पाणी बचतीचा मंत्र जपण्यास सुरुवात केली होती. या मोहिमेसाठी पालिकेने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याची ‘सदिच्छा दूत’ म्हणून नियुक्ती केली होती. पाणी बचतीसंदर्भात पालिकेने एक लघुपटही प्रदर्शित केला होता. या लघुपटाच्या माध्यमातून सचिन तेंडुलकरने नागरिकांना पाणी बचतीचे महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न केला होता. काही महिन्यांपूर्वी स्वच्छता मोहिमेसाठी पालिकेने अभिनेता सलमान खानची मदत घेतली होती.

राज्य सरकारने प्लास्टिक बंदीची घोषणा केल्यानंतर मुंबईत त्याची अंमलबजावणी करण्याची तयारी पालिकेने सुरू केली आहे. नागरिकांना आपल्या घरातील प्लास्टिकच्या पिशव्यांची विल्हेवाट लावणे शक्य व्हावे यासाठी पालिकेने मंडया, पालिका कार्यलये आणि सार्वजनिक ठिकाणी पेटय़ा उपलब्ध केल्या आहेत. या पेटय़ांमध्ये प्लास्टिकच्या पिशव्या जमा कराव्या असे आवाहन पालिकेने नागरिकांना केले आहे. मात्र नागरिकांकडून थंड प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे आता पालिकेने समाजमनावर छाप पाडू शकेल अशा व्यक्तीची ‘सदिच्छा दूत’ म्हणून नियुक्ती करून त्याच्या माध्यमातून ‘प्लास्टिक बंदी’बाबत जनजागृती करण्याचा निर्णय घेतला आहे.

महाराष्ट्रातील गावखेडय़ांमधील दुष्काळाची परिस्थिती बदलण्याचा संकल्प ‘पाणी फाऊंडेशन’ने सोडला असून या फाऊंडेशनचा सदस्य असलेला अभिनेता आमीर खानने ‘प्लास्टिक बंदी’विषयी जनजागृतीची धुरा खांद्यावर घ्यावी असे पालिकेच्या काही अधिकाऱ्यांना वाटत आहे. त्याचबरोबर अभिषेक आणि ऐश्वर्या बच्चन, तसेच अजय आणि काजोल देवगण या दाम्पत्यांनीही प्लास्टिकविरोधातील मोहिमेत सहभागी व्हावे अशीही काही अधिकाऱ्यांची इच्छा आहे. ‘सदिच्छा दूत’ म्हणून जबाबदारी स्वीकारावी यासाठी पालिकेने आमीर खानबरोबरच बच्चन आणि देवगण दाम्पत्याला पत्र पाठविले आहे. मात्र या पत्राचे अद्याप पालिकेला उत्तर मिळालेले नाही. या मंडळींनी ‘सदिच्छा दूत’ म्हणून जबाबदारी स्वीकारण्याची तयारी दर्शविल्यानंतर त्यांच्या माध्यमातून मुंबईकरांना प्लास्टिकमुळे पर्यावरणाचा होत असलेला ऱ्हास आणि त्यावर घातलेल्या बंदीचे महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.

‘प्लास्टिक बंदी’च्या मोहिमेमध्ये समाजातील विविध स्तरातील लोकांना सहभागी करून घेण्याचा पालिकेचा मानस आहे. आमीर खान, तसेच बच्चन आणि देवगण दाम्पत्याने या मोहिमेत सहभागी होऊन ‘प्लास्टिक बंदी’चे महत्त्व पटवून दिल्यास समाजमनावर त्याचा परिणाम होऊ शकेल.

– अजोय मेहता, पालिका आयुक्त