मुंबई महापालिकेच्या मुख्यालयातील अतिमहत्त्वाच्या व्यक्तींचा राबता लक्षात घेऊन सुरक्षेसाठी सीसी टीव्ही बसविण्यात आले आहेत. मात्र त्यापैकी बहुतांश सीसी टीव्ही बंद पडले आहेत. तर सीसी टीव्हीवरील चित्रीकरणावर लक्ष ठेवण्यासाठी एकच सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आला आहे. तसेच मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावरील स्कॅनरही गेले अनेक दिवस बंदच आहेत. यामुळे पालिका मुख्यालय असुरक्षित बनले आहे.
महापौर, पालिका आयुक्त, वैधानिक समित्यांचे अध्यक्ष यांची दालने पालिका मुख्यालयात आहेत. तसेच पालिकेचे अनेक महत्त्वाचे विभाग आणि त्यांचे प्रमुखही याच इमारतीत असतात. त्याशिवाय महापौर आणि आयुक्तांना भेटण्यासाठी अनेक अतिमहत्त्वाच्या व्यक्ती, परदेशी नागरिकांचे शिष्टमंडळ पालिका मुख्यालयात येत असतात. तसेच नागरी कामांसाठी सर्वसामान्य नागरिकांचाही पालिका मुख्यालयात राबता असतो. मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पालिका मुख्यालयातील सुरक्षा अधिक कडक करण्यात आली. तसेच मुख्यालयाच्या जुन्या आणि नव्या इमारतीमध्ये सीसी टीव्ही बसविण्यात आले. आजघडीला यापैकी बहुतांश सीसी टीव्ही बंद पडले आहेत. सध्या सीसी टीव्हीवरील चित्रीकरण पाहण्यासाठी उपलब्ध सात एलईडीपैकी चार बंद पडले आहेत. मात्र सीस टीव्हीच्या चित्रीकरणावर लक्ष ठेवण्यासाठी केवळ एकच सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आला आहे. पालिका मुख्यालयात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची आणि त्याच्याकडील सामानाची प्रवेशद्वारांवर तपासणी केली जाते. मात्र सामानाची तपासणी करण्यासाठी उपलब्ध असलेले स्कॅनर बंद आहेत. अनेक वेळा तपासणीशिवाय व्यक्ती मुख्यालयात प्रवेश करताना दिसतात. प्रशासनाच्या उदासिनतेमुळे आजघडीला पालिका मुख्यालयाची सुरक्षा धोक्यात आली आहे. बंद अवस्थेतील सीसी टीव्ही तात्काळ दुरुस्त करावेत, सीसी टीव्हीचे चित्रीकरण पाहण्यासाठी तज्त्र मंडळींची नियुक्ती करावी, प्रवेशद्वारांवरील स्कॅनर कार्यान्वित करावेत, अशी मागणी मनसेचे नगरसेवक दिलीप लांडे यांनी पालिका आयुक्त सीताराम कुंटे यांना केली आहे.