वशिल्याचे तट्ट घुसविण्यासाठीच बहुधा नायर रुग्णालयाने सक्षम असल्याचे प्रमाणपत्र दिल्यावरही मुंबई महानगरपालिकेच्या प्रमुख सुरक्षा अधिकाऱ्याने शारिरिकदृष्टय़ा तंदुरुस्त नाही या सबबीखाली अपात्र ठरविल्याची चर्चा आहे. या साऱ्यामागे मोठे षडयंत्र असण्याची शक्यता वर्तविली जात असून, काही जणांना घुसविण्यासाठीच हे उद्योग सुरू झाले आहेत.
पालिकेच्या सुरक्षा दलात ९५० सुरक्षा रक्षकांची भरतीसाठी तब्बल ३५ हजार उमेदवारांची भांडूप कॉम्प्लेक्स येथे चाचणी घेण्यात आली. या चाचणीदरम्यान अर्ज केलेल्या उमेदवारासाठी भलत्याच व्यक्तींनी चाचणी दिल्याचे हाती आलेल्या कागदपत्रांवरुन यापूर्वीच उघड झाले आहे. भांडूप कॉम्प्लेक्समधील चाचणीत उत्तीर्ण झाल्यानंतर सुरक्षा रक्षक पदावर नेमणूक करण्यापूर्वी संबंधित उमेदवारांना ३१ ऑगस्ट २०१३ रोजी पालिकेच्या एफ-दक्षिण विभाग कार्यालयातील वैद्यकीय परीक्षकांकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले. त्यापैकी काहींना वैद्यकीय परीक्षकांनी वैद्यकीयदृष्टय़ा अपात्र ठरविले आणि थेट बाहेरचा रस्ता दाखविला. दरम्यानच्या काळात पालिकेच्या नायर रुग्णालयात याच उमेदवारांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली होती. या तपासणीमध्ये नेत्र चिकित्सा करुन छातीचा एक्सरे काढण्यात आला. तसेच वजन आणि उंचीही तपासण्यात आली. रुग्णालयातील तपासणीनंतर अनेक उमेदवारांना सक्षम असल्याचे प्रमाणपत्रही देण्यात आले. मात्र रुग्णालयाने सक्षम असल्याचे प्रमाणपत्र दिले असतानाही एफ-दक्षिण विभाग कार्यालयातील वैद्यकीय अधिकाऱ्याने या उमेदवारांना अपात्र ठरविले. प्रमुख सुरक्षा अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीने संबंधित उमेदवारांना अपात्र ठरविण्यात आल्याचे पत्र पाठविण्यात आले. रुग्णालयाने सक्षम ठरविले असताना आपण अपात्र असल्याचे पालिकेने कळविल्यामुळे या उमेदवरांना धक्काच बसला. आपल्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी उमेदवार मंडळी पालिकेत खेटे घालू लागले आहेत. मात्र कोणीच दाद देत नसल्यामुळे ते हतबल झाले आहेत.
सुरक्षा रक्षक भरतीमधील एकेक घोटाळे उघड होऊ लागले असून संबंधित अधिकाऱ्यांची धावपळ उडाली आहे. प्रमुख कर्मचारी अधिकारी, चौकशी अधिकारी, रोजगार  व समाज कल्याण विभागाचे अधिकारी, पालिका उपायुक्त यांच्या अनुपस्थितीत पार पाडण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेबाबत संशय निर्माण झाला आहे. उमेदवारांनी केलेले अर्ज, चाचणी अहवाल, रुग्णालयातील वैद्यकीय अहवाल आणि एफ-दक्षिण कार्यालयातील वैद्यकीय निरीक्षकाने केलेल्या तपासणीचा अहवाल प्रशासनाने ताब्यात घेऊन या प्रकरणाची सखोल चौकशी करावी आणि दोषींविरुद्ध कडक कारवाई करावी, अशी मागणी राजकारण्यांकडूनही करण्यात येत आहे. मात्र अद्यापही अर्ज आणि अहवाल सुरक्षा रक्षक दलाच्याच ताब्यात असल्यामुळे त्यात फेरबदल होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान, या संदर्भात विचारणा करण्यासाठी पालिकेच्या सुरक्षा दलाचे प्रमुख सुरक्षा अधिकारी ए. पी. वीर यांच्याशी मोबाइलवर संपर्क साधाला असता आपण बैठकीत असल्याचे सांगून त्यांनी दूरध्वनी बंद केला.