परवानगीसाठी पालिकेचे ‘अ‍ॅनिमल वेल्फेअर बोर्डा’ला पत्र

मुंबई : गेल्या काही वर्षांमध्ये मुंबईमधील वस्त्या, झोपडपट्टय़ा, चाळींमध्ये भटक्या मांजरांचा उपद्रव वाढला असून कुत्र्यांप्रमाणे मांजरांचीही नसबंदी करण्यात यावी, अशी मागणी मुंबईकरांकडून करण्यात येत आहे. या मागणीची दखल घेऊन भटक्या श्वानांच्या नियंत्रणासाठी काढण्यात आलेल्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये भटक्या मांजरांचा समावेश करावा, असे पत्र पालिकेच्या देवनार पशुवधगृह खात्याने अ‍ॅनिमल वेल्फेअर बोर्ड ऑफ इंडियाला पाठविले आहे. ‘अ‍ॅनिमल वेल्फेअर बोर्ड ऑफ इंडिया’ने मार्गदर्शक तत्त्वांमध्ये भटक्या मांजरींच्या नियंत्रणाचा समावेश केल्यानंतर मुंबईमधील भटक्या मांजरींची नसबंदी करण्याचा मार्ग मोकळा होऊ शकेल, असे पालिका अधिकाऱ्याने सांगितले.

गेल्या काही वर्षांमध्ये मुंबईमध्ये भटक्या मांजरींच्या संख्येत प्रचंड वाढ झाली आहे. वस्त्या, झोपडपट्टय़ा, चाळींमध्ये भटक्या मांजरींचा मोठय़ा प्रमाणावर वावर असतो. भटक्या कुत्र्यांची नसबंदी करून त्यांच्या संख्येवर नियंत्रण करण्याची तरतूद पालिका अधिनियमात करण्यात आली आहे. मात्र भटक्या मांजरींच्या संख्येवर नियंत्रण आणण्यासाठी त्यांची नसबंदी करण्याबाबत कोणतीच तरतूद पालिका अधिनियमात नाही. त्यामुळे पालिकेला भटक्या मांजरींच्या वाढत्या संख्येला आळा घालणे शक्य झालेले नाही.

उपद्रव करणाऱ्या भटक्या मांजरींची नसबंदी करून त्यांच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण आणावे आणि त्यांना रेबीजचे इंजेक्शन द्यावे, अशी मागणी शिवसेना नगरसेवक अनिल पाटणकर यांनी पालिका सभागृहात ठरावाची सूचना मांडून केली होती. ही ठरावाची सूचना एकमताने मंजूर करून पालिका आयुक्तांकडे अभिप्रायासाठी पाठविण्यात आली होती.

पालिका प्रशासनाने या ठरावाच्या सूचनेवर अभिप्राय सादर केला आहे. ‘प्राणी क्लेश प्रतिबंधक कायदा १९६०’, ‘प्राणी जनन नियंत्रण नियमावली २००१’नुसार मुंबईतील भटक्या कुत्र्यांची नसबंदी करण्यात येते. मात्र भटक्या मांजरींची नसबंदी करण्यासाठी याबाबतची मार्गदर्शक तत्त्वे आणि नियमावली तयार करण्याची गरज आहे. भटक्या कुत्र्यांबाबतच्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये भटक्या मांजरींचाही समावेश करण्यात यावा, अशा आशयाचे पत्र पालिकेने अ‍ॅनिमल वेल्फेअर बोर्ड ऑफ इंडियाला पाठविले आहे.