थकबाकीदारांविरोधात पालिका आक्रमक; मेस्को एअरलाइन्स कंपनीवर कारवाई; मालमत्ता कर संकलनाचे खडतर आव्हान

मुंबई : पालिकेचा महत्त्वाचा महसुलाचा स्रोत असलेल्या मालमत्ता कराच्या वसुलीसाठी पालिकेच्या करनिर्धारण विभागाने आता मोठमोठय़ा कंपन्यांवर जप्तीची कारवाई सुरू केली आहे. मंगळवारी करनिर्धारण व संकलक विभागाने जुहू परिसरातून मेस्को एअरलाइन्स या खासगी कंपनीची दोन हेलिकॉप्टर्स जप्त केली, तर बांद्रा येथील वधवा ट्रेड सेंटरची जलजोडणी तोडण्यात आली आहे.

जकात बंद झाल्यानंतर पालिकेची सगळी आर्थिक मदार मालमत्ता करातून येणाऱ्या उत्पन्नावरच आहे. मात्र मोठमोठय़ा कंपन्यांनी पालिकेचा मालमत्ता कर मोठय़ा प्रमाणावर थकवला आहे. या करवसुलीसाठी करनिर्धारण विभागाने आता कंबर कसली आहे. गेल्या आठवडय़ात रस्त्यांवरून दवंडी पिटल्याप्रमाणे ध्वनिक्षेपकावरून मालमत्ता कर भरण्याबाबत जनजागृतीही करण्यात आली. या वर्षी पालिकेच्या करनिर्धारण विभागाची वसुली चांगलीच घटली आहे. आर्थिक वर्ष संपत आले तरी केवळ ३००० कोटींची वसुली झालेली असल्यामुळे पालिकेने आता मालमत्तांना नोटिसा धाडणे, जप्ती, पाणी तोडणे अशा कारवाया सुरू केल्या आहेत.

या वर्षी मालमत्ता करवसुलीसाठी ५१०० कोटींचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.  करनिर्धारण विभागाला महिन्याभरात २००० कोटींची तूट भरून काढावी लागणार आहे, तर गेल्या अनेक वर्षांपासून व्यापारी संस्थांनी थकवलेल्या मालमत्ता कराची संचित थकबाकी १५००० कोटींवर गेली आहे. मोठय़ा १०० थकबाकीदारांची यादी नुकतीच पालिकेने जाहीर केली असून मोठय़ा १० थकबाकीदारांच्या मालमत्तांवर जप्तीची कारवाई सुरू करण्यात आल्याची माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली. त्यामध्ये विविध वर्गवारींअंतर्गत असणाऱ्या मालमत्तांचा समावेश आहे.

मेस्को एअरलाइन्सची गेल्या वर्षी १ कोटी ६४ लाखांची थकबाकी होती. कंपनीवर गेल्या वर्षी पाणी तोडण्याची कारवाई करण्यात आली होती. मात्र तरीही कंपनीने या वर्षीही मालमत्ता कर न भरल्यामुळे त्यात ३० लाखांनी वाढ होत ही थकबाकी १ कोटी ९६ लाखांवर पोहोचली होती. त्यामुळे करनिर्धारण विभागाने के पश्चिम विभाग कार्यालयाच्या मदतीने हेलिकॉप्टर जप्तीची कारवाई करण्यात आली.

कारवाईचे टप्पे

’ मालमत्ताधारकांना मालमत्ता कराची देयके प्राप्त झाल्यापासून ९० दिवसांच्या आत मालमत्ता कर जमा करणे आवश्यक आहे.

’ जे मालमत्ताधारक मुदतीत कर भरत नाहीत, त्यांच्यावर कारवाई सुरू करण्यात येते.

’ सर्वप्रथम महापालिकेचे अधिकारी प्रत्यक्ष संपर्क व संवाद साधून देयक भरण्यासाठी पाठपुरावा करतात.

’ तरीही देयक अदा न केल्यास ‘डिमांड लेटर’ पाठविले जाते.

’ पुढच्या टप्प्यात २१ दिवसांची अंतिम नोटीस मालमत्ताधारकास दिली जाते.

’ नंतरच्या टप्प्यात मालमत्ता व्यावसायिक स्वरूपाची असल्यास जलजोडणी खंडित करण्याची कारवाईदेखील केली जाते.

’ शेवटच्या टप्प्यामध्ये मालमत्ता जप्तीची कारवाई केली जाते.

आठवडय़ाभरात केवळ ७९ कोटींची वसुली

गेल्या आठवडय़ात मालमत्ता कराची ३०८७ कोटींची वसुली झाली होती. त्यात या आठवडय़ात केवळ ३१५५ कोटींची वसुली झाली आहे. त्यामुळे आठ दिवसांत केवळ ७८ कोटींची वसुली झाली आहे. अत्यंत धिम्या गतीने ही वसुली होत असल्यामुळे पालिकेला यंदा मालमत्ता कराच्या वसुलीचे ध्येय गाठता येईल की नाही, अशी शंका निर्माण झाली आहे.