रस्ते अडवून मंडप उभारल्याप्रकरणी कारवाईस सुरुवात

परवानगी मिळालेली नसतानाच रस्त्यामध्ये मंडप उभारून गणेशोत्सव साजरा करणाऱ्या सार्वजनिक गणेश मंडळांना पालिकेने दणका देण्यास सुरुवात केली असून मुंबईतील अनेक गणेश मंडळांवर पालिकेने सोमवारी नोटीस बजावली आहे. त्यामुळे गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांचे धाबे दणाणले असून त्यांनी राजकीय नेत्यांकडे धाव घेतली आहे. मात्र पालिका निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर कायदेशीर अडचणीत सापडू नये, म्हणून नेतेमंडळींनीही आता या मुद्दय़ावरून हात वर करण्यास सुरुवात केली आहे.

वाहतूक आणि पादचाऱ्यांना अडथळा ठरणाऱ्या रस्त्यांमधील मंडपांविरुद्ध न्यायालयाने कडक भूमिका घेतली आहे. न्यायालयाच्या भीतीमुळे पालिका, वाहतूक आणि स्थानिक पोलिसांनी यंदा सावध पवित्रा घेतला होता. यंदा गणेशोत्सवासाठी मंडपाची उभारणी करण्यास परवानगी मिळावी म्हणून २,५३० मंडळांनी पालिकेकडे अर्ज केले होते. रस्त्यावरील वाहतूक आणि पादचाऱ्यांना त्रास होत नसल्याची खातरजमा केल्यानंतर पालिका, वाहतूक आणि स्थानिक पोलिसांनी तब्बल १,३१९ मंडळांना मंडप उभारणीस परवानगी दिली होती, तर वाहतूक आणि पादचाऱ्यांना अडथळा निर्माण करणाऱ्या ५०५ मंडळांना मंडप उभारणीस परवानगी नाकारण्यात आली होती. तसेच पोलिसांकडे ५८१, तर पालिकेकडे १२५ अशा एकूण ७०६ मंडळांच्या अर्जावर कोणताच निर्णय घेण्यात आला नव्हता.

पालिका आणि पोलिसांनी परवानगी नाकारलेल्या ५०५ पैकी बहुसंख्य मंडळांनी सर्रास मंडपउभारणी करून गणेशोत्सव साजरा केला आहे. त्याचबरोबर पालिका अथवा पोलिसांकडे परवानगीसाठी अर्ज न करता काही मंडळांनी रस्ता, पदपथावर मंडप उभारले आहेत. या सर्व मंडपांची पालिका अधिकाऱ्यांनी पाहणी केली आहे. परवानगी मिळालेली नसताना सर्व नियम धाब्यावर बसवून रस्त्यावर मंडप उभारून गणेशोत्सव साजरा करणाऱ्या गणेश मंडळांवर नोटीस बजावण्यास पालिकेने सोमवारपासून सुरुवात केली. ४८ तासांमध्ये मंडप काढून रस्ता वाहतूक आणि पादचाऱ्यांसाठी मोकळा करण्याचे आदेश पालिकेने नोटीसद्वारे दिले आहेत. मंगळवारी ईदनिमित्त सुट्टी असून बुधवारी गणेश मंडळांना नोटीसला उत्तर द्यावे लागणार आहे. त्यानंतर गुरुवारी अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणेश विसर्जन आहे. त्यामुळे आता गणेशोत्सवानंतरच मंडळांवर कारवाई होण्याची शक्यता आहे.

 

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार गणेश मंडळांनी तंतोतंत पालन केले आहे. काही तांत्रिक कारणामुळे परवानगी मिळाली नसेल तर त्याचा फेरविचार व्हायला हवा. न्यायालयाचा मान ठेवून उत्सव साजरा करतोय. पालिकेच्या नोटीसला मंडळांकडून योग्य ते उत्तर दिले जाईल.  काही मंडळांनी नकाशे दिले नाहीत, खड्डे बुजवले नाहीत, अशा त्रुटी राहिल्या आहेत.

– अ‍ॅड. नरेश दहिबावकर, अध्यक्ष, बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समिती

 

पालिकेने या प्रकरणात सुवर्णमध्य काढायला हवा होता. या संदर्भात चर्चा करण्यासाठी आमचे शिष्टमंडळ पालिका अधिकाऱ्यांची भेट घेईल.

– संजय यादवराव, कार्याध्यक्ष, अखिल सार्वजनिक गणेशोत्सव महासंघ, महाराष्ट्र