मुंबई महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना आदेश

मुंबई : टप्प्याटप्प्याने शिथिल होत असलेली टाळेबंदी, कार्यालयांमधील कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात आलेली वाढ आणि गणेशोत्सवानिमित्त भाविकांनी केलेली गर्दी अशा विविध कारणांमुळे मुंबईतील वर्दळ वाढली असून या पार्श्वभूमीवर मुंबईत दररोज सरासरी १४ हजार चाचण्या करण्याचे लक्ष्य मुंबई महापालिकेने ठेवले आहे. पालिका आयुक्तांनी तसे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.

गणेशोत्सवापासून मुंबईत वर्दळ वाढू लागली आहे. त्याचबरोबर राज्य सरकारने कार्यालयांमध्ये ३० टक्के  कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीला परवानगी दिली आहे. कार्यालयांपर्यंत पोहोचण्याबाबत कोणतेही नियोजन नसल्यामुळे अनेक कर्मचारी स्वत:च्या खासगी वाहनाने कार्यालयात पोहोचू लागले आहे. त्यामुळे रस्ते वाहतुकीवर प्रचंड ताण येऊन रस्त्यांवरही वर्दळ वाढू लागली आहे. मात्र सामाजिक अंतराच्या नियमांचा उडणारा बोजवारा, मुखपट्टय़ांचा अयोग्य पद्धतीने वापर आदी विविध कारणांमुळे करोना संसर्गाचा प्रसार वाढण्याची भीती व्यक्त होऊ लागली आहे. या बाबी लक्षात घेऊन पालिकेने मुंबईमध्ये पुन्हा करोनाबाधितांचा शोध घेण्याचा निर्णय घेतला आहे.

पालिकेने मे-जूनमध्ये प्रतिदिन चार हजार चाचण्या करण्याचा निर्णय घेतला होता. त्याच वेळी प्रतिजन चाचण्यांनाही सुरुवात झाली. परिणामी, प्रतिदिन सुमारे ६,५०० चाचण्या करण्यात येत होत्या. पालिका प्रशासनाने जुलैमध्ये चाचणीसाठी डॉक्टरांच्या शिफारसपत्राची अट काढून टाकली. तसेच २३ प्रयोगशाळांच्या माध्यमातून घरी जाऊन करोना चाचण्या करण्याची मुभा दिली. परिणामी या महिन्यात दररोज ७,६१९ चाचण्या करणे शक्य झाले. पालिकेने ऑगस्टच्या शेवटच्या आठवडय़ात चाचण्यांच्या प्रमाणात सुधारणा करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार दररोज नऊ ते १० हजार चाचण्यांचे लक्ष्य ठरविण्यात आले. या काळात एका दिवशी ११ हजार ८६१ चाचण्या करण्यात आल्या होत्या. आता सप्टेंबरमध्ये दर दिवशी १० ते १४ हजार चाचण्यांचे लक्ष्य पालिकेने ठेवले आहे.

प्रतिदिन दोन हजारांनी रुग्ण वाढणार?

मुंबईत सापडलेल्या करोनाबाधितांपैकी ६० ते ७० टक्के रुग्णांना कोणतीही लक्षणे नाहीत. त्यांना गृह विलगीकरणात ठेवण्यात आले आहेत. मात्र चाचण्यांचे प्रमाण वाढविण्यात आल्यामुळे येत्या काळात दर दिवशी करोनाबाधितांची संख्या दोन हजारांनी वाढण्याची शक्यता आहे. रुग्णांना वेगळे ठेवून करोनाचा संसर्ग पसरू नये याची काळजी घेण्यात येईल. त्यासाठी अतिदक्षता विभागाची सुविधा असलेल्या २५० खाटा वाढविण्यात येणार आहेत. सध्या विविध ठिकाणच्या करोना आरोग्य केंद्रांमधील ४,८०० खाटा रिकाम्या आहेत. तर जम्बो सुविधा असलेल्या केंद्रात ६,२०० खाटा उपलब्ध झाल्या आहेत.

अतिजोखमीचे संपर्क शोधण्याचे पालिका आयुक्तांचे निर्देश

झोपडपट्टयांमध्ये ‘चेस द व्हायरस’ ही मोहीम राबवून ज्या पद्धतीने अतिजोखमीचे संपर्क शोधले गेले तशाच आक्रमक पद्धतीने इमारतींमध्येही अतिजोखमीचे संपर्क शोधा, असे निर्देश पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी विभाग अधिकाऱ्यांना दिले आहेत. सोमवारी पालिका आयुक्तांनी दृकश्राव्य माध्यमातून सर्व विभाग अधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. यात मुंबईतील करोना रुग्णवाढीच्या सद्यस्थितीवर चर्चा झाली. यावेळी मुंबईतील अतिजोखमीचे संपर्क शोधण्याची मोहीम मंदावली असल्याबद्दल आयुक्तांनी नाराजी व्यक्त केली. सध्या मुंबईत जे रुग्ण सापडत आहेत ते उच्चभ्रू सोसायटय़ा, इमारती येथील रुग्ण सापडत आहेत. मात्र सुरुवातीच्या टप्प्यात जेव्हा मुंबईत झोपडपट्टी भागातील रुग्ण सापडत होते, त्यावेळी अतिजोखमीचे संपर्क मोठय़ा प्रमाणावर शोधले गेले. त्यामुळे तेथील संसर्ग आटोक्यात आला. तशीच मोहीम आता इमारतींमध्ये राबवावी, असे निर्देश आयुक्तांनी दिली आहेत. झोपडपट्टीत जसे एका रुग्णामागे १५ संपर्क असे प्रमाण ठेवण्यात आले होते. तसेच प्रमाण इमारतीतील एका रुग्णामागेही ठेवण्याबाबत सांगण्यात आले आहे.

एखाद्या इमारतीमध्ये कोणीही प्रतिष्ठित व्यक्ती रुग्ण म्हणून सापडली तरी तिचे निकट संपर्क शोधण्यात अजिबात कसूर करू नका, अशी सूचना देण्यात आल्या आहेत. ती व्यक्ती गेल्या सात आठ दिवसात कुठे गेली होती, कोणाच्या संपर्कात आली होती याची सर्व माहिती घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.