अभियंते, निरीक्षक, कनिष्ठ वृक्ष अधिकाऱ्यांवर वसुलीची जबाबदारी

प्रसाद रावकर, लोकसत्ता

मुंबई : मुखपट्टीचा वापर टाळणाऱ्यांविरुद्ध कारवाईचा बडगा उगारण्यासाठी मुंबई महापालिकेतील सात खात्यांतील अभियंते, निरीक्षक, कनिष्ठ आवेक्षक आणि कनिष्ठ वृक्ष अधिकाऱ्यांना वेठीस धरले असून या खात्यांमधील पदनिहाय प्रत्येक कर्मचाऱ्याला दररोज मुखपट्टीचा वापर न करणाऱ्या किमान पाच ते कमाल १० जणांविरुद्ध कारवाई करण्याचे फर्मान सोडण्यात आले आहे. या कामांमुळे संबंधित कर्मचारी हैराण झाले आहेत.

करोनाचा संसर्ग पसरू नये यासाठी सार्वजनिक ठिकाणी मुखपट्टीचा वापर करणे बंधनकारक आहे. सार्वजनिक ठिकाणी मुखपट्टीचा वापर न करणाऱ्यांना पालिकेकडून २०० रुपये दंड आकारण्यात येतो. दंडाची वसुली सुरू झाल्यानंतरही बहुसंख्य मुंबईकर मुखपट्टीचा वापर करीत नसल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे पालिका प्रशासनाने अधिक प्रभावीपणे कारवाई करण्याचा निर्णय घेतला. दंडवसुलीच्या कामाची जबाबदारी मुंबईतील पालिकेच्या २४ विभाग कार्यालयांमधील परिरक्षण, इमारत आणि कारखाने, दुकाने व आस्थापना, अनुज्ञापन, अतिक्रमण निर्मूलन, कीटक नियंत्रण, उद्यान खात्यातील कर्मचाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे. विभाग कार्यालयाच्या हद्दीत दर दिवशी मुखपट्टी न वापरणाऱ्या किमान एक हजार व्यक्तींविरुद्ध कारवाई करण्याचे उद्दिष्ट या कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहे, तर या खात्यांतील पदानुसार काही कर्मचाऱ्यांना किमान पाच, तर काही कर्मचाऱ्यांना १० व्यक्तींविरुद्ध कारवाई करण्याचे फर्मान सोडण्यात आले आहे.

विभाग कार्यालयांतील परिरक्षण खात्यातील सात कनिष्ठ अभियंता, चार दुय्यम अभियंता, दोन रस्ते अभियंता कार्यरत असून कनिष्ठ अभियंत्यांना प्रतिदिन १०, दुय्यम व दोन रस्ते अभियंत्यांना प्रतिदिन पाच जणांविरुद्ध कारवाईचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. या विभागाने सायंकाळी सात वाजेपर्यंत किमान ९५ जणांविरुद्ध केलेल्या कारवाईचा अहवाल सादर करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

इमारत व कारखाने खात्यातील सात कनिष्ठ अभियंत्यांना प्रत्येकी १०, तर चार दुय्यम अभियंत्यांना पाच अशा ९० जणांविरुद्ध कारवाईचे उद्दिष्ट दिले आहे. दुकाने व आस्थापना खात्यातील तीन निरीक्षकांना प्रतिदिन प्रत्येकी १०, अनुज्ञापन खात्यातील चार निरीक्षकांना दररोज प्रत्येकी ४०, अतिक्रमण निर्मूलन खात्यातील चार निरीक्षकांना प्रतिदिन प्रत्येकी १०, कीटक नियंत्रण खात्यातील आठ कनिष्ठ आवेक्षकांना दररोज प्रत्येकी १० जणांविरुद्ध कारवाई करण्याची जबाबदारी आहे.

कर्मचारी हैराण

प्रत्येक विभाग कार्यालयाच्या हद्दीतील मास्क न वापरणाऱ्या एक हजार व्यक्तींवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. काही विभागांमध्ये अभियंत्यांना या कामातून सूट मिळाली आहे. पण या अभियंत्यांचे काम अन्य खात्यातील आवेक्षक, निरीक्षक वा संबंधित अधिकाऱ्यांवर सोपविण्यात आले आहे. दंडवसुली करताना नागरिकांशी होणाऱ्या वादामुळे ही मंडळी हैराण झाली आहेत.