18 July 2019

News Flash

पत्रकारांचीच मुस्कटदाबी  

प्रवेशबंदी करण्यात आल्यामुळे नवाच वादंग निर्माण झाला.

(संग्रहित छायाचित्र)

पारदर्शक कारभाराचा ढोल बडवणाऱ्या मुंबई महापालिका प्रशासनाने शुक्रवारी आपल्या भ्रष्ट कारभाराची लक्तरे लपवण्यासाठी पत्रकारांचीच मुस्कटदाबी केली. वाहिन्यांसह सर्वच पत्रकारांना पालिका मुख्यालयात प्रवेशबंदी करण्यात आल्यामुळे नवाच वादंग निर्माण झाला.

पालिकेने संरचनात्मक तपासणी केली असतानाही हिमालय पूल पडल्यामुळे या घटनेचे गांभीर्य वाढले आहे. त्यामुळे सर्व प्रसिद्धी माध्यमांचे लक्ष पालिकेच्या भूमिकेकडे लागले. मात्र पालिका प्रशासनाने पत्रकारांना पालिका मुख्यालयात प्रवेशबंदी करून आपली हुकूमशाही वृत्ती दाखवून दिली.

दीड वर्षांत पादचारी पुलाच्या तीन दुर्घटना घडल्यानंतर पालिकेने मोठा गाजावाजा करून पुलांची संरचनात्मक तपासणी केली. त्याच्या अहवालानुसार पुलांच्या दुरुस्तीची, पुनर्बाधणीची कामे पालिकेने हाती घेतली होती. तरीही हा पूल पडल्यामुळे असंख्य प्रश्न उपस्थित झाले आहेत. त्यांची उत्तरे देण्यास पालिकेतील सत्ताधारी पक्ष आणि प्रशासन बांधील असताना शुक्रवारी पालिका प्रशासनाने यापैकी कशालाही सामोरे जाण्याची तयारी दाखवली नाही.

पालिका आयुक्त अजोय मेहता आणि पूल विभागाची जबाबदारी असलेले अतिरिक्त आयुक्त विजय सिंघल यांना भेटण्यासाठी पत्रकारांनी सकाळपासूनच त्यांच्या दालनाबाहेर गर्दी केली होती. मात्र पत्रकारांना त्यांनी आत बोलावले नाही किंवा पत्रकार परिषदही घेतली नाही. इतकेच नव्हे, तर पत्रकारांना आत का सोडले, म्हणून अतिरिक्त आयुक्त सिंघल यांनी सुरक्षारक्षकांनाच फैलावर घेतले.  त्यामुळे दुपारनंतर पत्रकारांना विशेषत: वाहिन्यांच्या पत्रकारांना, कॅमेरामनना पालिका मुख्यालयात प्रवेशबंदी घालण्यात आली होती. त्यामुळे पत्रकार आणि सुरक्षारक्षकांमध्ये मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावरच वादावादी सुरू होती.

या घटनेनंतर पत्रकारांनी आवाज उठवल्यानंतर ही बंदी तासाभराने शिथिल केली. मात्र पालिका आयुक्तांच्या दालनाकडे जाणारा मार्ग पत्रकारांसाठी बंद ठेवण्यात आला होता. गेल्याच आठवडय़ात पालिकेच्या स्थायी समितीमध्ये हजारो कोटींचे प्रस्ताव मंजूर झाले. मात्र त्यात पुलांच्या दुरुस्तीचा प्रस्ताव का मंजूर होऊ शकला नाही, या पुलाची  संरचनात्मक तपासणी योग्य पद्धतीने झाली होती की नाही, या प्रश्नांची उत्तरे सर्वसामान्यांना मिळणे आवश्यक होते. मात्र,पत्रकारांची मुस्कटदाबी करण्यातच प्रशासनाने  आपली कार्यक्षमता पणाला लावली होती.

First Published on March 16, 2019 1:03 am

Web Title: bmc shiv sena cst bridge collapse