शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रथम पुण्यतिथीदिन जवळ आला तरी अद्याप त्यांच्या स्मारकाची जागा ठरत नसल्याने शिवसैनिकांमध्ये संतापाची भावना आह़े त्यातच ‘चला शिवतीर्थ’ अशी हाक एका सर्वसामान्य शिवसैनिकाने देताच महापौर, स्थायी समिती अध्यक्ष आणि सभागृह नेत्यांचे धाबे दणाणले आहे. या दिवशी निदान बाळासाहेबांचे स्मृती उद्यान तरी दिसावे व शिवसैनिकांचा रोष शांत व्हावा, यासाठी या त्रिमूर्तीने युद्धपातळीवर प्रयत्न सुरू करत २० बाय ४० फुटांचे स्मृती उद्यान पूर्ण करण्याचे काम हाती घेतले आहे.
बाळासाहेबांची १७ नोव्हेंबर रोजी पहिली पुण्यतिथी आहे. त्यांच्यावर अंत्यसंस्कार झालेल्या ठिकाणी वंदन करण्यासाठी शिवसैनिकांनी यावे, अशी हाक वरळीतील एका शिवसैनिकाने दिली आहे. इतकेच नव्हे तर दिवाळीची भेटकार्ड न वाटता त्याने पुण्यातिथी दिनी शिवाजी पार्कवर येण्यासाठी शिवसैनिकांना हजारोंच्या संख्येने कार्ड पाठवले. ही माहिती समजताच महापौर सुनील प्रभू, स्थायी समिती अध्यक्ष राहुल शेवाळे आणि सभागृह नेते यशोधर फणसे यांचे धाबे दणाणले. हजारो शिवसैनिक १७ नोव्हेंबर रोजी शिवतीर्थावर आले आणि त्यांना बाळासाहेबांच्या स्मृती जागत्या ठेवल्याचे दिसले नाही तर प्रचंड क्षोभ उसळेल. पालिकेत सत्ता असूनही आपण अकार्यक्षम ठरल्याचे सिद्ध होईल. त्यातून आपली अवस्थाही मनोहर पंतांसारखी होऊ शकते हे लक्षात आल्याने या त्रिमूर्तीने आपली सारी पत पणाला लावली आहे. दादरमधून निवडणूक लढवण्याची स्वप्ने पाहणारे शेवाळे यांना शिवतीर्थावरील बाळासाहेबांच्या स्मृती उद्यानाचे राजकीय महत्त्व चांगलेच ठाऊक आहे. शिवाजी पार्क, महापौर बंगला, महालक्ष्मीचे रेसकोर्स ही ठिकाणे शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकासाठी चर्चेत होती. परंतु शिवसेनेला यापैकी एकाही ठिकाणी बाळासाहेबांच्या स्मारकाची एक वीटही उभारता आलेली नाही.
स्मृती उद्यानात मातीचा भराव टाकून चौथरा उभारण्यास हेरिटेज समितीने मान्यता दिल्यानंतर तात्काळ हे काम सुरू करणे अपेक्षित होते. परंतु स्मृती उद्यानाचा विषय विस्मृतीत गेला. आता या तिघांनी अतिरिक्त आयुक्त मोहन अडतानी यांच्यासह शिवाजी पार्कमधील स्मृती उद्यानात धाव घेत काम सुरू केले आहे. मात्र या स्मृती उद्यानात सिमेंट काँक्रिटचे कोणतेही बांधकाम करता येणार नसल्याने या जागेत मातीचा भाराव टाकून उंचवटे तयार करण्यात येत आहेत. त्यावर कृत्रिम हिरवळ तयार करून १७ नोव्हेंबपर्यंत स्मृती उद्यान सज्ज ठेवण्यात येणार आहे.
छाया : प्रशांत नाडकर