सामान्य मुंबईकरांना खड्डय़ांचा त्रास होऊ नये, त्यांचा प्रवास सुखाचा व्हावा, रस्त्यावरील खाचखळग्यांनी त्यांचा विलंब होऊ नये या उदात्त हेतूने पालिका अधिकारी आता स्वतच रस्त्यावर उतरून या खाचखळग्यांची, खड्डय़ांची पाहणी करणार आहेत! आपल्या या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांना जनहिताच्या या कामात कोणतीही तोशीस पडू नये यासाठी ‘श्रीमंत’ मुंबई महापालिकेने त्यांच्या दिमतीला एक कोटी २९ लाख ७९ रुपये खर्चून भाडय़ाच्या गाडय़ा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे.
रस्ते पाहणीचे काम दररोज कार्यक्षमतेने व्हावे यासाठी पालिकेच्या ४० अधिकाऱ्यांना बिगरवातानुकूलित गाडय़ा देण्यात येणार आहेत. टूरिस्ट परमीटधारक कंपनीकडून भाडेतत्वावर गाडय़ा घेण्यात येणार आहेत. पालिकेने मागविलेल्या निविदांत फोर्टपॉइंट ऑटोमोटिव्ह (कार्स) प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने दरमहिना २६,००१ मासिक भाडे आकारून गाडी उपलब्ध करण्याची तयारी दर्शविली आहे. त्यामुळे हे कंत्राट याच कंपनीला देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. संबंधित अधिकाऱ्यांना भाडय़ाच्या गाडय़ांतून खड्डय़ांची पाहणी करता येणार असली तरी त्यांना प्रवासभत्ता व वाहतूक भत्ता खंडित करण्यात येणार आहे. दर महिन्याला २००० कि.मी. व २७५ तास ही गाडी वापरण्यात येणार आहे.

पालिकेच्या अटी
* गाडी बिगरवातानुकूलित असावी
* मात्र तीत दोन पंखे असावेत
* पंखा नसल्यास प्रतिदिन ५० रुपये दंड
*  गाडी उपलब्ध न झाल्यास, बिघडल्यास, बिघडल्यानंतर दोन तास उपलब्ध न झाल्यास प्रतिदिन ६०० रुपये दंड