News Flash

१५०० कोटींची खुशामत!

आचारसंहिता लागू झाल्यावर स्थायी समितीत विकासकामांचे कोणतेही प्रस्ताव मान्य करता येत नाहीत.

स्थायी समितीत ९० मिनिटांत ९७ प्रस्तावांना मंजुरी

मुंबई महापालिकेची निवडणूक जसजशी जवळ येऊ लागली आहे, तसतशी मतदारांना खूश करण्यासाठी राजकारण्यांची लगबग वाढू लागली आहे. शहरातील विविध कामांचे तब्बल १२०० कोटी रुपयांचे प्रस्ताव गेल्या आठवडय़ात मंजूर केल्यानंतर स्थायी समितीच्या बुधवारच्या बैठकीत आणखी १५०० कोटी रुपयांचे प्रस्ताव मार्गी लावण्यात आले. अवघ्या ९० मिनिटांच्या बैठकीत मंजूर करण्यात आलेल्या या ९७ प्रस्तावांमध्ये नाल्यांचे बांधकाम, पाणीगळती रोखणे, मैदानांचे सुशोभीकरण, रस्त्यांचे पृष्ठीकरण अशा अनेक महिन्यांपासून रखडलेल्या कामांचा समावेश आहे.

आचारसंहिता लागू झाल्यावर स्थायी समितीत विकासकामांचे कोणतेही प्रस्ताव मान्य करता येत नाहीत. नवीन वर्षांच्या पहिल्या आठवडय़ात आचारसंहिता लागण्याची शक्यता असल्याने स्थायी समितीच्या बैठकीत शेकडो कोटींचे प्रस्ताव मार्गी लावले जात आहेत. समितीत दर आठवडय़ाला साधारण तीस प्रस्ताव चर्चेला असतात. मात्र गेल्या बुधवारी सुमारे १२०० कोटी रुपयांचे तब्बल ७४ प्रस्ताव चर्चेला आणले गेले व एका तासात कोणत्याही चर्चेशिवाय मान्यही करण्यात आले.

निविदा प्रक्रिया पूर्ण होऊनही प्रस्ताव सादर करण्यास विलंब करत असलेल्या प्रशासनामुळे एकगठ्ठा प्रस्ताव मान्य करावे लागत असल्याचे स्पष्टीकरण स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे यांनी पत्रकार परिषदेत दिले होते. प्रस्तावांना विलंब होत असल्याबद्दल प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना बैठकीत जाबही विचारला जाईल, असे ते म्हणाले होते. प्रत्यक्षात अतिरिक्त आयुक्त संजय देशमुख यांच्याकडून एका ओळीचे तुटपुंजे स्पष्टीकरण स्वीकारून बुधवारच्या बैठकीत, तब्बल ९७ प्रस्तावांना एका फटक्यात मान्यता देण्यात आली.

विशेष म्हणजे यातील केवळ ६३ प्रस्ताव स्थायी समिती सदस्यांकडे तीन दिवस आधी आले होते. उर्वरित २८ प्रस्ताव घाईघाईने मंगळवारी घुसवण्यात आले. मात्र त्यांनाही स्थायी समितीत विरोध करण्यात आला नाही. नाल्यांचे बांधकाम, पाणीगळती रोखणे, मैदानांचे सुशोभीकरण, रस्त्यांचे पृष्ठीकरण आदी प्रस्ताव या बैठकीत होते. याशिवाय किनारा रस्ता प्रकल्पासाठी सल्लागार नेमणे, पवई तलावाचे सुशोभीकरण असे मागच्या आठवडय़ात मागे ठेवण्यात आलेले २०० कोटी रुपयांचे प्रलंबित प्रस्तावही मान्य झाले.

पुढची स्थायी समिती मंगळवारी

दर आठवडय़ात साधारण बुधवारी असलेली स्थायी समितीची पुढची बैठक मंगळवारी, ३ जानेवारी रोजी ठेवण्यात आली आहे. त्यामुळे आचारसंहिता मंगळवापर्यंत लागणार नसल्याची चर्चा पालिका वर्तुळात होती.

एका प्रस्तावाला मात्र विरोध

कोटय़वधी रुपयांचे प्रस्ताव मिनिटाला दोन या वेगाने मान्य होत असताना एक प्रस्ताव मात्र राखून ठेवण्यात आला. गोरेगाव पश्चिम येथील सिद्धार्थनगर रुग्णालयापासून खाडीपर्यंत शास्त्रीनगर नाल्याचे बांधकाम व रुंदीकरण करण्यासाठी मेसर्स एस. एन. बी. इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. यांना २५ कोटी ३५ लाख रुपयांचे कंत्राट देण्याचा प्रशासनाचा प्रस्ताव रोखण्यात आला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 29, 2016 4:00 am

Web Title: bmc standing committee approved 97 proposals
Next Stories
1 फेरीवाल्यांच्या मुजोरीला कलम ‘१४४’चे कवच
2 हरितपट्टय़ातील नागरी समस्या
3 हृदयप्रत्यारोपणात सातपट वाढ
Just Now!
X