मधुमेहाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली असून मुंबई महापालिकेनेही याची दखल घेऊन जवळपास ५७ स्वतंत्र दवाखाने सुरू केले आहेत. मनसेने शिवाजी पार्क-माहीम मतदारसंघात मधुमेहाविरोधात लढाई सुरू केली आहे. केवळ मधुमेहाच्या चाचणी शिबिरापुरतेच काम न करता सलग सहा महिने मधुमेहाच्या रुग्णांकडून व्यायाम करून घेण्यापासून नियमित तपासणी करून मधुमेह आटोक्यात आणण्याचा उपक्रम राबविण्यात आला आहे. विशेष म्हणजे यासाठी आयोजित केलेल्या स्पर्धेत प्रथम येणाऱ्याला चक्क एक लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे.
मधुमेहामुळे राष्ट्रीय मनुष्यबळाची तसेच मोठय़ा प्रमाणात अर्थव्यवस्थेचीही हानी होते. या रुग्णांनी मधुमेह आटोक्यात ठेवला नाही, तर डोळे, मेंदू, हृदयविकारासह मज्जासंस्थांवर विपरीत परिणाम होऊन मनुष्याची कार्यशक्ती कमी होते तसेच उपचारावर लक्षावधी रुपयांचा खर्च येत असतो. हे लक्षात घेऊन शिवाजी पार्क येथील मनसेचे नगरसेवक व गटनेते संदीप देशपांडे यांनी अनोखा उपक्रम १४ नोव्हेंबरपासून हाती घेतला. यात मतदारसंघातील मधुमेहाच्या रुग्णांची नोंदणी, त्यांची र्सवकष चाचणी यामध्ये मागील तीन महिन्यांच्या मधुमेहाची सरासरी काढण्यासह या रुग्णांसाठी एक कार्यक्रम दिला आहे. पुढील सहा महिने या रुग्णांच्या आहारावर, चालणे तसेच अन्य व्यायामांसह त्यांच्या दिनक्रमाचा आढावा घेतला जाणार आहे. यातून संबंधित रुग्णांचा मधुमेह निश्चित कमी होईल हे जरी खरे असले तरी आपल्या आरोग्यासाठी मधुमेहाच्या रुग्णांनी आहारविहारात नियमितता आणणे, हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश असल्याचे संदीप देशपांडे यांनी सांगितले. शिवाजी पार्क- माहीम मतदारसंघ हा मनसेचा बालेकिल्ला असल्यामुळे पहिल्या टप्प्यात हा उपक्रम येथे राबविण्यात आला असून यासाठी एक लाख रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आले आहे. शेकडो लोक या स्पर्धेत सहभागी झाले असून त्यासाठी डॉ. प्रदीप तशवलकर, डॉ. रामचंद्र करंबळेकर व डॉ. मनीषा तालीम यांची परीक्षक व मार्गदर्शक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. स्पर्धेला सुरुवात झाली तेव्हा तज्ज्ञांकडून आहारापासून व्यायामापर्यंत सर्व बाबतीत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच रोज सकाळी मोफत शारीरिक प्रशिक्षण उपलब्ध करून देण्यात आले असून सहा महिन्यांत तीन वेळा या स्पर्धेत सहभागी झालेल्यांची विनामूल्य रक्ताची तपासणीही केली जाणार असल्याचे देशपांडे यांनी सांगितले.